सध्या लॉकडाउन असतानाही काही महाभाग घराबाहेर पडत आहेत. सरकार वेळोवेळी सुचना करुन देखील काही लोकं अजूनही घराबाहेर पडत आहेत. यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध प्रकारे लोकांनी घरात बसण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही सगळ्यांना घरात बसण्याची विनंती केली आहे. हे सांगत असताना इतिहासाची माहिती ठेवणाऱ्या, इतिहासाचा अभ्यास असण्याऱ्या आणि सामाजीक भान असलेल्या मृणाल कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दोन प्रसंग सांगितले. त्या म्हणतात की, “आपल्याला 21 दिवस घरात राहणही मुश्किल होत आहे तरीही आपण म्हणतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. तब्बल 132 दिवस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते. कशाचीही शाश्वती नव्हती. आणि दुसरा प्रसंग आहे आग्र्याहून सुटकेचा. तब्बल 80 दिवस छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या प्रत्यक्ष कैदेत होते. कसे काढले असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी ते 80 दिवस? विचार करा काय त्यांची अवस्था झाली असेल. आपल्यासाठी आज हीच देशभक्ती आहे. एवढी सुखद देशभक्ती कुणाच्याही वाट्याला आलेली नसणार. अत्यंत शांतपणे देशभक्तीची ही संधी न सोडता 21 दिवस स्वत:च्या घरात स्वत:च्या मनाप्रमाणे स्वत:च्या कुटुंबियांबरोबर आपण हे दिवस घालवुयात.”
देशभक्ती काय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास काय सांगतो यासाठी मृणाल कुलकर्णी यांचा हा संपूर्ण व्हिडीओ पाहणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात कलाकार मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही जागरुकता आणि घरात बसण्याचं आवाहन करत आहेत हे कौतुकास्पद आहे.