सध्या जगभर करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर होत असून कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. यादरम्यान सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत.
देशातील नागरिकांना घरी राहून करोनाला हरवायचं आहे. ही शर्यत पळण्याची नाही, तर थांबून जिंकण्याची आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा वगळता आज सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. म्हणूनच घरी राहूया व करोनाला हरवूया. महाराष्ट्र पोलिसांनीसुध्दा करोनापासून बचाव करण्यासाठी घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. पण त्यासाठी त्यांनी त्याच्या सोशल मिडीयावर एक भन्नाट मीम शेअर केलं आहे.
तर त्याचं झालं असं मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनत्री अमृता खानविलकरची प्रसिध्द नटरंग सिनेमातील लावणी मला जाऊ द्या ना घरी... या गाण्याचं मीम बनवून महाराष्ट्र पोलिसांनी शे्र केलं आहे. ते म्हणतात, आता घरी राहून करोना व्हायरसचे 'बारा वाजवूयात,,,,मला राहू द्या ना घरी' , हे जबरदस्त मीम खुद्द अमृतानेच शेअर करत महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, संकटकाळी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उद्योगपती मान्यवर व सेलिब्रिटींनी सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड कलाकारांपाठोपाठ आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा करोना संकटातून राज्याला सावरायला पुढे सरसावले आहेत. अमृता खानविलकर हिनेसुध्दा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी खारीचा वाटा उचलला आहे.