लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर बहुतांश लोकं त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत, घरातील काही जुन्या गोष्टी, पुस्तकं यामध्ये काही जुने फोटोही सापडतात. यात कला विश्वातील काही कलाकार अशाच काही जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील त्यांच्या करियरमधील एका जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. 'अबोली' या त्यांच्या सिनेमाची ही आठवण आहे. या सिनेमात रेणुका शहाणे यांनी एक आदिवासी मुलगी साकारली होती. याविषयी रेणुका शहाणे पोस्टमध्ये लिहीतात की, "अबोली हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आणि भूमिका आहे. मी या सिनेमात एका आदिवासी मुलीची भूमिका साकारली होती. 1995 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामुळे मला 1996मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. हा तो काळ होता जेव्हा हिंदी फिल्मफेयर सोहळ्यात मराठी सिनेमांनाही पुरस्कार असे. अमोल शेडगे यांनी हा सिनेमा लिहीला आणि दिग्दर्शित केला होता. शिवाय अमोल शेडगे, निशिकांत सदाफुले यांची निर्मिती होती. इश्वर बिद्री सरांनी फिल्म चित्रीत केली होती. आणिआम्ही भाग्यवान होतो की याचे गीत प्रसिद्ध कवि ना धो महानोर यांचे होते. हा सिनेमा कोसबड या खऱ्याखुऱ्या आदिवासी गावात चित्रीत करण्यात आला होता. या सिनेमात सयाजी शिंदे, वर्षा उसगांवकर, दिपक शिंदे आणि मी होतो. खूप काही सांगून जाणारी अबोली"
असं म्हणत रेणुका शहाणे यांनी त्यांचा अबोली सिनेमाचा प्रवासही यात नमूत केला. रेणुका शहाणे यांच्यासह कित्येक कलाकार या लॉकडाउनमध्ये त्यांचा जुन्या कामाचे किंवा जुन्या आठवणींचे सोनेरी क्षण पुन्हा जगत आहेत.