करोनाचा कहर जगभर सुरुच आहे. लाखोंच्या संख्येने रुग्ण मरण पावत आहेत. पंतप्रधानांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, आपल्या सर्व सरकारी यंत्रणा या करोनाशी लढताना युध्द पातळीवर काम करतायत.आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
पण या सर्वांत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने सामाजिक भान जपत एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. याबाबतची एक खुप प्रेरणादायी पोस्ट केली आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनीच असं केलं तर एखाद्या कुटुंबाला नक्कीच थोडा का होईना पण आधार मिळेल.
शर्मिष्ठा म्हणते, लॉकडाऊनमुळे आज सर्वच बंद असल्याने घरी काम करणा-या ताई, मावशी येऊ शकत नाहीत.पण आम्ही त्यांचा पगार कापणार नाही. आपल्यामुळे कुणाचं आर्थिक नुकसान होईल कुणाचा पगार कापला जाईल, कुणाला कामावरुन काढून टाकलं जाईल, असं अजिबात करु नये. शक्य होईल तितकी मदत त्यांना करावी. आमच्या घरी येणा-या मावशींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी मी घेतली आहे."
शर्मिष्ठाच्या ह्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कौतुकास्पद प्रतिक्रीयांचा वर्षाव केला आहे. खरंच प्रत्येकाने जर शर्मिष्ठासारखा विचार केला तर अनेक लहान-मोठ्या गरजू कुंटुंबाला थोडातरी आधार मिळेल व माणुसकीची प्रचिती येईल !