संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान, पोलिस, पालिका कर्मचारी, डॉक्टर्स-वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आदी अहोरात्र झटतायत. आपल्या सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरचा थोडा ताण हलका होईल. तरीसुध्दा अनेक नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात या नियमाचं उल्लंघन करण्यात येतं. सोशल डिस्टन्सिंगचा थेट फज्जाच उडवला जातो. म्हणूनच या सर्वांसाठी अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक रेशम टिपणीसने शेअर केलेला हा फोटो सणसणीत चपराक ठरतोय
रेशमने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्या सर्व मांजरी ह्या घरात सोशल डिस्टन्सिंग पाळून आराम करत बसल्याचं पाहायला मिळतंय. जर मुक्या जनावरांना हे समजतंय तर मनुष्यप्राण्याला का नाही, असा प्रश्न इथे उद्भवतो. खुपच बोलकं असं हे चित्र रेशमच्या घरचं पाहायला मिळाला. रेशमला पाळीव प्राण्यांची खुप आवड आहे, तिच्या अनेक पोस्टमधून ते वारंवार पाहायला मिळतं.
रेशमच्या ह्या पोस्टनंतर आपल्या सुजाण नागरिकांचे डोळे उघडावेत, हीच प्रार्थना