आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत.
तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस कर्मचारी, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी सफाई कामगार सर्वच जण या युध्दात नागरिकांसाठी अहोरात्र झटतायत. म्हणूनच घराबाहेर न पडता त्यांच्यावरचा ताण कमी करुयात. हेच तुमचे लाडके सेलिब्रिटी ही जबाबदारी घेण्यासाठी एका छान गाण्यातून आवाहन करतायत.
दिग्दर्शक विजू माने यांनी हे घे जबाबदारी... तू रहा ना घरी...गाणं दिग्दर्शित केलं आहे. सर्व सेलिब्रिटींनी ह्यात आपापल्या घरातूनच सहभाग घेतला आहे. तर मराठी कलाकारांसोबतच या गाण्यात तब्बल २१ देशातल्या नागरिकांचा सहभाग पाहायला मिळतोय.