लॉकडाउनच्या या काळात सगळ्यांनाच घरात बसून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची ही खास संधी मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सोशल मिडीयावर सध्या जुन्या आठवणींचा पुर आलेला पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील कलाकारही या सध्या घरात बसूनच आहेत. आणि जुन्या आठवणींमध्येही रमत आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीही सोशल मिडीयावर त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘बालक पालक’ या त्यांच्या गाजलेल्या सिनेमाच्या डान्स रिहर्सलचा एक जुना व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आणि अभिनेता रोहीत फाळके पाहायला मिळत आहे. ‘यार बीना चैन’ या गाण्यावर हे दोघं डान्स रिहर्सल करत आहेत. हे गाणं ‘बालक पालक’ सिनेमात घेण्याचं कारण रवी जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून शेयर केलं आहे.
ते पोस्टमध्ये लिहीतात की, “१९८५ ला साहेब चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातल्या ‘यार बीना चैन कहा रे’ या गाण्याने भारतात ब्रेक डान्स अवतरला. डोंबीवलीत शाळेत, गणपतीला, पुजेला, रस्त्यावर जेथे संधी मिळेल तिथे या गाण्यावर मी आणि माझे ब्रेक डान्स फॅन मित्र बेभान नाचायचो. कालांतराने पुढे जेव्हा २०१२ ला मी बालक-पालक दिग्दर्शीत केला तेव्हा हे गाणे चित्रपटात नक्कीच असावे असे माझ्या मनांत पक्के होते. त्या गाण्याची रिहर्सल गमतीशीर होती. बालक- पालक मधील ‘चिऊ’ म्हणजेच आजच्या आनंदी गोपाळ या लोकप्रिय चित्रपटातील ‘आनंदी’ भाग्यश्री मिलिंद आणि बालक-पालक मधील ‘अव्या’ म्हणजेच लवकरच प्रदर्शित होणाऱ्या पांघरूण या चित्रपटातील प्रमुख कलाकार रोहीत फाळके यांनी या गाण्यात धमाल आणली होती. सोबतीला माझा मित्र UJ होताच.”
या आठवणींना उजाळा देत असतात पुन्हा जुने क्षण जगायला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कलाकारांचे हे सोनेरी क्षण या निमित्ताने त्यांना भरपुर आनंद देत आहेत.