अमिताभ बच्चन यांचा हा मराठी सिनेमा आता पाहायला मिळणार डिजीटल प्लॅटफॉर्मवर
बिग बी अमिताभ बच्चन हे एबी आणि सीडी या मराठी सिनेमात झळकणार म्हटल्यावर या सिनेमाविषयी उत्सुकता होती. मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कोरोनामुळे देशात लॉक़डाउन घोषीत करण्यात आला होता. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता आला नाही. मात्र आता लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले मुख्य भूमिकेत असलेला आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’ हा सिनेमा आता अमॅझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून येत्या 1 मे रोजी मिलिंद लेले दिग्दर्शित, हेमंत एदलाबादकर लिखित एबी आणि सीडी सिनेमाचा प्रिमिअर हा अमॅझ़ॉन प्राईमवर आयोजीत करण्यात आला आहे. हा सिनेमा आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्सित होत असल्याची घोषणा सिनेमाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे.
या सिनेमात विक्रम गोखले यांची चंद्रकांत देशपांडे नावाची भूमिका असून. चंद्रकांत यांना आलेलं पत्र त्या पत्राने झालेला घोळ आणि थेट अमिताभ बच्चन यांची भेट या सगळ्या गोष्टी रंजक पद्धतिने दाखवल्या आहेत. सिनेमात नीना कुळकर्णी, सुबोध भावे, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, शर्वरी लोहोकर, सागर तळाशीकर, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.