देशावर करोना संकट ओढवलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतायत. पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी. डॉक्टर्स-नर्सेस, सफाई कामगार हे सर्वचजण आपलं कर्तव्य मोठ्या नेटाने बजावतायत. म्हणूनच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यासुद्धा करोनाविषाणूशी रुग्णालयात लढत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत. खासदार व अभिनेत्याची पत्नी म्हणून कुठलाच बडेजाव त्यांच्याकडे नाही, निव्वळ रुग्णसेवा हे व्रत त्यांनी अंगिकारलं आहे.
डॉ. अश्विनी अमोल कोल्हे या २००९ पासून केईएम रुग्णालयात कार्यरत आहेत. खासदार अमोल कोल्हेंच्या पत्नी असल्या तरी आपल्या कर्तव्यात त्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही. दररोज घरातलं सर्व आवरुन. दोन्ही चिमुकल्यांची योग्य ती काळजी घेऊन, त्यांच्या जेवणाची सोय करुन त्या आपल्या ड्युटीवर हजर होतात व रुग्णसेवा करतात.
तर अमोल कोल्हेसुध्दा वेळोवेळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून या विषाणूशी लढा देण्यासाठी जनजागृती करताना पाहायला मिळतात. तसंच त्यांच्या जगदंब प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने गरंजूना मदतही करतात. नुकतंच जगदंब प्रतिष्ठानच्यावतीने अमोल कोल्हे यांनी पुणे ग्रामीण येथील पोलिसांच्या संरक्षणासाठी मास्क व सुरक्षा किट्सचं वाटप केलं आहे.
डॉक्टरी पेशाचा योग्य तो पुरेपूर वापर हे कोल्हे दाम्पत्य करोना संकटाशी लढताना करत आहे. त्यांचा आदर्श प्रत्येकानेच घ्यायला हवा.