लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रमाणेच मुलगा अभिनय बेर्डेलाही अभिनयाची आवड असल्याने त्यानेही सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र स्वत:ची ओळक बनवू पाहणाऱ्या अभिनयने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमे केले आहेत. ‘ती सध्या काय करते’ या 2017 मध्ये आलेल्या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत एन्ट्री केली होती.
नुकतच अभिनयच्या ‘रंपाट’ या सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि याच सिनेमाच्या खास आठवणी अभिनयने शेयर केल्या आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरण दरम्यानचे आणि प्रमोशन दरम्यानचे फोटो अभिनयने पोस्ट केले आहेत. अभिनय या पोस्टमध्ये लिहीतो की, “रंपाटला एक वर्ष झालं. अविस्मरणीय प्रवास, अविस्मरणीय लोकं, अविस्मरणीय आठवणी.”
या सिनेमात अभिनय बेर्डेची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सिनेमातही अभिनयच्या आईची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रवी जाधव यांनीही या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रवी जाधव पोस्टमध्ये लिहीतात की, “बघता बघता ‘रंपाट’ ला एक वर्ष झाल. या चित्रपटाच्या अनेक आठवणी-साठवणी आहेत. चित्रपट येतो आणि जातो परंतु या दरम्यान जोडलेली माणसे, व्यतीत केलेले क्षण कायम आपल्या कुटूंबाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग बनतात.”
लॉकडाउनच्या काळात सध्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यातच या सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सिनेमादरम्यानच्या आठवणींमध्ये हे कलाकार रमले आहेत.