सध्या कडक उन्हाळा सुरु आह, व यात मोठ्यांप्रमाणेच लहानांनीसुध्दा दिवसातून भरपूर पाणी व इतर पाणीसदृश्य पदार्थ घेणे आवश्यक आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे क्वारंटाईन जरा वेगळ्याच कामात व्यस्त आहे. ते म्हणजे, लाडकी लेक जिजाला ती नवनवीन गोष्टी व टास्क शिकविण्यासाठी, चांगल्या सवयी लावण्यासाठी ह्या क्वारंन्टाईन वेळेचा सदुपयोग करतेय. उर्मिला व जिजाचा एक खास मिनी व्लॉगसुध्दा आहे. नुकतंच उर्मिलाने खास उन्हाळ्यात मुलांना भरपूर पाणी पाजण्यासाठी कशी शक्कल लढवायची याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
उर्मिला म्हणते, आत्ताच जिजाची बाटली सुटली आहे. बाटली होती तेव्हा पाणी, दूध, ताक, ज्यूस अशी अनेक नानाविविध पेयं आपोआप पोटात जायची, परंतु आता तिला दिवसातू भरपूर पाणी पाजून तिला कॉन्सटिपेशनपासून दूर ठेवणं हा माझ्यासाठी तसा टास्क होता. पण मी शक्कल लढवलीच. तुम्ही या व्हिडीओत पाहतच आहात मी ग्लासातून तिला चमच्याने हळूहळू पाणी पाजतेय, तेही तिच्या आवडीच्या गोष्टी सांगून विविध प्राण्यांची चित्रं दाखवून किंवा आवडते व्हिडीओस दाखवून. महत्त्वाचं ते आहे, की खेळीमेळीच्या वातावरणात तिच्या पोटात जास्तीत जास्त पाणी जावं.
उर्मिला पुढे सांगते, सध्या चमच्याने मी जिजाला पाणी भरवतेय, पण पुढे लवकरच ती ग्लासने स्वत: पाणी पिऊ शकेल असा मला विश्वास आहे. सध्या उन्हाळ्यात हा तिला पाणी पाजण्याचा उपक्रम मी दिवसातून ३ ते ४ वेळा करतेय. तुम्हीसुध्दा तुमच्या मुलांसाठी-बाळांसाठी करा व आरोग्याच्या तक्रारींपासून दूर राहा.
छोटी जिजा खुपच चुणचुणीत आहे. आई उर्मिला कोठारेसोबतचे तिचे अनेक व्हिडीओज खुप व्हायरल होतात. जिजा उत्तम नकलासुध्दा करते, हे अळीमिळी गुपचिळी कार्यक्रमात सर्वांनाच समजलं. दरम्यान, गोड जिजा व तिच्या आईचा वेळ उत्तम जातोय, हेच खरं. मायलेकींच्या पुढच्या व्हिडीओची आम्ही वाट पाहतोय.