‘सारेगमप’ या प्रसिद्ध गाणाच्या शोला 25 वर्षे पूर्ण झाल्याची निमित्ताने एक आगळावेगळा लाईव्ह कार्यक्रम रंगणार आहे. येत्या रविवारी तब्बल 25 तास सलग हा कार्यक्रम रंगणार असून ‘लाईव्ह ए थॉन’ असं या म्युझिकल कार्यक्रमाचं नाव आहे. सोशल मिडीयावर याचं लाईव्ह प्रक्षेपण होणार असून यातून कोवीड -19 सहायता निधीसाठी मदतही जमा केली जाणार आहे.
शिवाय मराठी कलाकारही येत्या रविवारी झी मराठी वाहिनीवर गाण्याची मैफल रंगवणार आहेत. यात गाणी, किस्से, गप्पा आणि सारेगमपचा 25 वर्षांचा इतिहास याची मैफल रंगणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, गिरीजा ओक, अमृता सुभाष हे कलाकार गाणी गाताना दिसत आहेत. तेव्हा या कलाकारांच्या सुरांची ही मैफल अनुभवणं रंजक असेल. अभिनेता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार आहे. अर्थात हा कार्यक्रम सगळे कलाकार, गायक-गायिका घरात बसूनच करणार आहेत. तेव्हा येणारा हा रविवार हा ‘सारेगमप’मय होणार एवढं नक्की. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘सारेगमप’च्या आठवणी आणि सुरेल मैफल तर रंगेलच मात्र त्यातून कोरोनाग्रस्तांसाठी मदत निधीही जमा होत असल्यानं या कल्पनेचं कौतुक होत आहे.