'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया हे कॅरेक्टर प्रचंड चर्चेत आलं होतं. अभिनेत्री रसिका सुनिलने ही भूमिका साकारली होती. यासाठी तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. मुळात ही भूमिका तिने उत्तम वठवली. त्यानंतर रसिका सिनेमातही झळकली. पण या मालिकेतील या भूमिका पासून ती दुरावली जेव्हा शिक्षणासाठी ती भारताबाहेर गेली. मात्र आजही तिचं नाव काढलं की शनाया अशी ओळख तिला मिळते.
मात्र अभिनय क्षेत्रात येण्याआधी रसिकाला संगीत क्षेत्रात रस होता. अगदी लहानपणापासून ती गाण्याचे कार्यक्रम करायची. शिवाय तिने हिंदुस्तानी क्लासिकल विशारद डिग्रीही घेतलीय. या संगीत क्षेत्रातील तिच्या प्रवासात तिला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंचे रसिकाने आभार मानले आहेत. तिने नुकतच एक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये ती ‘मी डोलकर डोलकर..’ हे गाणं गात आहे. रसिकाने गायलेलं हे सुरेल गाणं तिच्या चाहत्यांना आवडतय. शिवाय या पोस्टमध्ये तिने तिच्या गुरुंसाठी कॅप्शनही लिहीलय. ती लिहीते की, “हे गाणं माझ्या ह्दयाच्या अत्यंत जवळ आहे. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाण्याचे कार्यक्रम करतेय, या अनुभवासाठी मी माझे शिक्षक, वसुधा आंबेकर यांना याचं श्रेय देते ज्यांनी मला हार्मोनियम शिकवलं आणि मला हिंदुस्तानी क्लासिकल विशारद डिग्रीसाठी मार्गदर्शन केलं. प्रदीप साठे सर यांचेही आभार मानते ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि ते उत्तम गुरु आहेत. ते दिवस खूप सुंदर होते. मला आठवतय महाराष्ट्रातील विविध शहरात मी गाण्याचे कार्यक्रम करायची. साठे सरांचं म्हणणं होतं की प्रत्येक कलाकाराने मंचावर गाणं गात असताना एकतरी वाद्य हातात असायला हवं.तुम्हा दोघही गुरुंचे मी आभार मानते. मी तुम्हा दोघांना हे छोटसं ट्रीब्यूट या गाण्याने देत आहे. त्या सोनेरी क्षणांसाठी जे तुम्ही मला भेट म्हणून दिले.”
या सुंदर गाण्यासह अतिशय सुंदर शब्दात रसिकाने या तिच्या गुरुंचे आभार मानत त्यांना ट्रीब्यूट दिलं आहे.