सध्या लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं काम बंद आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकार घरीच आहेत. त्यामुळे घरात बसूनच विविध व्हिडीओ, लाईव्ह मुलाखती, गप्पा, कवितांचे-गाण्यांचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टी हे कलाकार करत आहेत. त्यातच या कलाकारांना घरातूनच कॅमेऱ्यात टीपण्याची युक्ती प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस नेरुरकरला सुचली. त्यातून ‘फोन टू फोन फोटोग्राफी’ चा कॉन्सेप्ट त्याने सुरु केला. घरात बसलेल्या या कलाकारांना त्यांने अतिशय सुंदर पद्धतिने टिपलं.
यामध्ये महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, मनवा नाईक, विजू माने, रवी जाधव, प्रवीण तरडे, संजय जाधव यांच्यासह विविध कलाकारांचा समावेश होता. आता याच कॉन्सेप्टचा दुसरा भाग तेजस नेरुरकर घेऊन येत आहे. या दुसऱ्या भागात कोणते कलाकार असतील हे अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र या संकल्पनेच्या पहिल्या प्रयत्नाला तेजसला यश मिळालं होतं. त्याच्या या कामाचं कौतुकही झालं होतं. आता दुसऱ्या भागात तो आणखी काय घेऊन येतोय हे पाहणं औत्सुक्याचं असेल.