राष्ट्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विद्यमाने आयोजित इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवात यावेळी मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. या महोत्सवात एक, दोन नाही तर जवळपास दहा सिनेमे दाखवले जाणार आहेत.
४ ते १३ जानेवारी दरम्यान या चित्रपट महोत्सवाचे आयोजन दिल्लीमधील सिरीफोर्ट ऑडिटोरियम येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवत ‘खरवस’ या मराठी सिनेमाने झाली आहे. एखाद्या महोत्सवात एकाचवेळी दहा मराठी सिनेमे दाखवले जाणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवाची बाब आहे. दहा दिवस चालणा-या या चित्रपट महोत्सवात एकूण 47 चित्रपट दाखविण्यात येणार असून यात 10 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवाच्या दुस-या दिवशी शेखर रणखंबे दिग्दर्शित ‘पाम्फलेट’ आणि गौतम वझे दिग्दर्शित ‘आईशप्प्थ’ चित्रपट दाखविण्यात आले. तिस-या दिवशी रविवारी नितेश पाटणकर दिग्दर्शित ‘ना बोले वो हराम’, मंगळवारी सकाळच्या सत्रात स्वप्नील कपुरे दिग्दर्शित ‘भर दुपारी’ व याच सत्रात ‘आम्ही दोघी’ हा प्रतिमा जोशी दिग्दर्शित चित्रपट तर तर दुपारच्या सत्रात प्रसन्न पोंडे दिग्दर्शित ‘सायलेंट स्क्रिम’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
गुरूवार दिनांक 10 जानेवारी ला सायंकाळच्या सत्रात सुहास जहागिरदार दिग्दर्शित ‘एस आय एम माऊली’ तर शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ हा चित्रपट आणि शनिवारी सकाळच्या सत्रात मेधपर्णव पवार दिग्दर्शित ‘हॅप्पी बर्थडे’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यापैकी ‘आम्ही दोघी’ आणि ‘धप्पा’ वगळता अन्य नॉन फिचर फिल्मस आहेत.
मराठी सिनेमांच्या निर्मितीचा विस्तारणारा परीघ मराठीचा झेंडा अटकेपार नेत आहे यात शंका नाही.