लॉकडाउन आणि अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू पुर्ववत होणारी स्थिती पाहता या सगळ्यात सकारात्मकतेची प्रचंड गरज आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार या दरम्यान सकारात्मकता पसरवण्यासाठी विविध व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत आहेत.
नुकताच मराठी कलाकारांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हे कलाकार प्रसिद्ध कवि सुरेश भट यांची कविता म्हणताना दिसत आहेत. 'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही' ही कविता हे कलाकार एकत्र मिळून म्हणत आहेत. या व्हिडीओत चिन्मय मांडलेकर, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, मुक्ता बर्वे, ऋतुजा बागवे, सुबोध भावे, सायली संजीव, धनश्री कडगावकर, सलील कुलकर्णी, अतुल काळे, पुष्करराज चिरपुरकर, शिवराज वैचल, नितीश चव्हाण, भक्ती देसाई हे कलाकार आहेत. उत्कर्ष जाधव आणि सायली जाधव यांची ही या व्हिडीओची संकल्पना आहे.
या कलाकारांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया साईटवर पोस्ट केला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हा व्हिडीओ पोस्ट करत लिहीत की, "जिथे सगळं संपलं असं वाटतं तीच वेळ असते नवं सुरु होण्याची.."
कवि सुरेश भट यांचे शब्द आणि मराठीतील हे उत्तम कलाकार या व्हिडीओतून सकारात्मक संदेश देत आहेत. या व्हिडीओतून इतरांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.