By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या तारका असलेल्या या कार्यक्रमाने केली अकरा वर्षं पूर्ण

सियाचेनपासून अंदमानपर्यंत दुबईपासून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या 'मराठी तारका' या कार्यक्रमानं ११ वर्षं पूर्ण केली आहेत. या खास औचित्याने निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची संकल्पना आणि निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा विशेष सोहळा १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानात रंगणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

गेल्या ११ वर्षांपासून मराठी अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या 'मराठी तारका' या गीत-संगीत-नृत्याच्या कार्यक्रमाने तमाम मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची दादही मिळवली आहे. मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणारा हा कार्यक्रम दुबई, अमेरिका, लंडन आणि भारतभरात मिळून ५०० हून अधिक शोज झाले आहेत. त्याशिवाय २००८मध्ये राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची उपस्थितीही लाभली होती. कला क्षेत्रातील पं. बिरजू महाराज, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, वहिदा रेहमान, शोभा डे यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही हा कार्यक्रम पाहिला आहे. आत्तापर्यत सहा पिढ्यांमधील अभिनेत्रींनी मराठी तारका या कार्यक्रमात नृत्यकला सादर केली आहे आणि करीत आहेत.

मराठी भाषा, संगीत, संस्कृतीला या कार्यक्रमातून जगापुढे मांडताना सामाजिक भानही राखलं आहे. म्हणून बॉर्डरवरील जवानांसाठी मोफत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. तर पोलीस कल्याण निधीसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून २ कोटींचा निधी जमवण्यात हातभार लावला.

त्यामुळे ११ वर्षांच्या टप्प्यावर आलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर असाच एक तप, द्विदशकपूर्तीचीही वाटचाल करेल यात काहीच शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive