करोनाने प्रत्येकाचंच आयुष्य विस्कटून टाकलं आहे. प्रत्येकजण नेहमीचं आयुष्य विसरून करोनाच्या सावटाखाली जगत आहे. अनेक सेलिब्रिटी करोनाशी लढा देत आहेत. काहींना करोनामुळे प्राणही गमवावे लागले आहेत. प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनादेखील करोनाची लागण झाली होती. पण त्यांनी करोनाशी लढा देत त्यावर मात केली आहे. मिलिंद इंगळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत करोनाविरुद्धचा लढा कसा होता हे सांगितलं आहे.
मिलिंद या व्हिडियोमध्ये म्हणतात, ‘करोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि पालिकेची परवानगी घेऊन घरीच क्वारंटाइन करुन घेतलं. सुरुवातीला मला फार त्रास जाणवला नाही. मात्र काही दिवसानंतर श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे मी नानावटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो. उपचारानंतर मला घरी पाठविण्यात आलं.
त्यानंतर पुन्हा मी १४ दिवस घरीच क्वारंटाइन झालो. त्यामुळे आता आपले रिपोर्ट्स निगेटिव्ह येतील असं वाटलं होतं. पण काही दिवसांनंतर मला परत अस्वस्थ वाटू लागलं. या त्रासानंतर मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळी करोनाचा संसर्ग माझ्या शरीरातील अन्य भागांवर झाला होता. त्यानंतर मनात प्रचंड भिती दाटून आली होती. पण या लढ्यात धैर्य एकवटून मी परिस्थितीचा सामना केला.’ यासोबतच मिलिंद यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.