By  
on  

भाई : व्यक्ती की वल्लीमधील दृश्यामुळे सिनेमा वादाच्या भोव-यात, जाणून घ्या का निर्माण झालाय वाद

पु. ल. देशपांडे यांना अवघ्या मराठी जनांच्या मनात आदराचं स्थान आहे. नेमकं हेच जणून घेऊन महेश मांजरेकरांनी पु.लंचा बायोपिक भाई : व्यक्ती की वल्ली या सिनेमाची निर्मिती केली. पण पूर्ण अभ्यासाशिवाय केलेली निर्मिती मांजरेकरांना चांगलीच महागात पडेल असं दिसतंय. कारण, या सिनेमाचा उत्तरार्ध प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाला वादाचं ग्रहण लागलेलं आहे.
या सिनेमात गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या कलाकारांशी संबंधित सिनेमातील प्रसंग अत्यंत चुकिचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा अपमान करणारे असल्याची तक्रार प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी तसेच हिराबाई बडोदेकर यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर यांनी केली आहे. या दोघांनी एका पत्रकाद्वारे या सिनेमातील काही दृश्यांविषयी आक्षेप नोंदवला आहे.
देशाला आदरणीय असलेल्या या कलाकारांबाबत वापरलेली भाषा अत्यंत हीन आहे. याशिवाय काही आक्षेपार्ह आणि चुकिचे प्रसंगही या व्यक्तिमत्वांच्या नावावर खपवण्यात आले आहेत. यामुळे या बुजुर्ग कलाकारांची प्रतिमा मलीन होईलच याशिवाय नव्या पिढीलाही चुकिचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक-निर्माते यांनी या प्रकाराची जबाबदारी घेऊन चित्रपटातील चुकीचे प्रसंग काढून टाकावेत आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागावी,' अशी मागणी श्रीनिवास जोशी आणि मीना फातर्पेकर यांनी केली आहे. देशाने या कलावंतांवर अमाप प्रेम केलं आहे. त्यामुळेच त्यामुळे त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने या चित्रपटाकडे रसिकांनीच पाठ फिरवावी आणि आपल्या दैवतांचे असे विद्रुपीकरण खपवून घेऊ नये, असं या पत्रकात म्हटलं आहे.
यावर सिनेमाच्या निर्मात्यांची काय प्रतिक्रिया आहे हे अजून समजलेलं नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive