‘ब्रीद’(Breathe) या आर माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या वेब सीरीजचा पहिला सीझन लोकप्रिय झाल्यानंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या वेबसिरीजचा दुसरा सीझन येतोय. त्याचाही बराच गाजावाजा सोशल मिडीयावर सुरु आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर आपला मराठमोळा हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेश इन्स्पेक्टर प्रकाश या भूमिकेत आहे. त्यामुळे हृषिकेशला या वेबसिरीजमध्ये पाहण्यासाठी तमाम मराठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
‘ब्रीद’च्या सेटवर अभिषेक बच्चन आणि हृषिकेश जोशी यांच्यात चांगलीच मैत्री झाली. दोघंही खुप गप्पा मारायचे, क्रिकेट खेळायचे, एकत्र जेवायचे, असं हृषिकेश सांगतो. एकदा खुद्द जया बच्चन यांच्या हातचा गाजर हलवा अभिषेकने खास हृषिकेशसाठी आणला होता. तसंच अभिषेकला हृषिकेशने अमिताभ बच्चन यांच्या पाहिलेल्या सिनेमांची नोंदवहीसुध्दा दाखवली. ती पाहून तो अवाक् झाला. तसंच अभिषेकला मराठी कलाकार, रंगभूमी आणि सिनेमांबद्दल बरीच आत्मियता असल्याचंसुध्दा हृषिकेश पुढे नमूद करतो.
तसंच नुकतंच हृषिकेशच्या नेटक या ऑनलाईन नाटकाचा शुभारंभसुध्दा अभिषेक बच्चननेच ट्विटर पोस्टच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळालं.
अभिषेक बच्चन, हृषिकेश जोशी यांच्यासोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेननचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. १० जुलै रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या सिझनचेही दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे. तर भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या सीरिजचे लेखन केले आहे.