सोशल मिडियावर सेलिब्रिटींना अनेकदा सायबर बुलिंगला सामोरं जावं लागतं. अभिनेत्रींना तर अत्यंत अश्लील कमेंटस, ट्रोलिंग यांना सतत सामोरं जावं लागतं. सध्या सोशल मिडियावर #indiaagainstabuse हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यामध्ये सोनम कपूर, दीया मिर्जा, अहाना कुमरा, कोंकणा सेनशर्मा, आलिया भट या अभिनेत्रींनी मत मांडलं होतं. यासोबतच अमृता सुभाषनेही या चळवळीत सहभाग नोंदवला आहे.
यावेळी अमृताने एक व्हिडियो शेअर केला आहे. याशिवाय #indiaagainstabuse नावाचं पिटीशन तिने साईन करण्याची चाहत्यांना विनंती केली आहे. यासोबतच आसपासच्या लोकांनाही हे पिटीशन साईन करण्याची विनंती तिने केली आहे. या व्हिडियोमध्ये ती म्हणते, ‘ मला अनेकदा काम आवडलं नसल्याबाबत कळवलं जातं. पण कितीतरी वेळा ही पद्धत अत्यंत वाईट असते. अनेकदा वाईट फोटो पाठवले जातात. बलात्काराच्या धमक्या मिळतात. पण हे थांबवणं गरजेचं आहे.’