By  
on  

Review: गंभीर विषयाची हलकी फुलकी मांडणी आहे ‘धप्पा’ या सिनेमात

दिग्दर्शक: निपुण धर्माधिकारी
कलाकार: वृषाली कुलकर्णी,इरावती हर्षे,श्रीकांत यादव,गिरीश कुलकर्णी,चंद्रकांत काळे,ज्योती सुभाष,उमेश जगताप,आकाश कांबळे,शारवी कुलकर्णी,अक्षय यादव,शर्व वढवेकर,श्रीहरी अभ्यंकर,दीपाली बोरकर,अभिजीत शिंदे, नील देशपांडे
लेखक: गिरीश कुलकर्णी
वेळ: 2 तास
रेटींग : 3.5 मून
सिनेमाची धाटणी ओळखीची असली तरी त्यातला आशय मात्र नवा विचार देणारा आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर दिसत असलेली लहान मुलं जाता जाता मोठ्यांना काहीतरी शिकवून जाणारा आहे यात शंका नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जड जड बोलण्याऐवजी हलकं फुलकं चित्रण मनोरंजनाचा हेतू साध्य करतं.
कथानक
एका सोसायटीमधील गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या घटनेवर हा सिनेमा बेतलेला आहे. गणेशोत्सवात सादर करण्यासाठी सोसायटीमधील मुलं अनुराधा देवधर उर्फ अनू मावशी (वृषाली कुलकर्णी )च्या मदतीने नाटक बसवित असतात. पर्यावरण, मानवी उत्क्रांती आणि प्रदुषण या समस्यांची जाणीव होण्यासाठी झाडे पळाली हे नाटक करण्याचं ठरतं. या नाटकात सर्व प्रकारची पात्रं असतात. त्यामध्ये परी, तुकाराम, येशु ख्रिस्त यांचा समावेश असतो. मात्र येशुवर आधारीत नाटक असल्यामुळे एका राजकीय नेत्याचे कार्यकर्ते मुलांचा सराव सुरू असतो, त्या ठिकाणी जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण करतात आणि मुलांनी बनवलेल्या वस्तूंची नासधूस करतात. याशिवाय येशू ख्रिस्ताचा संदर्भ असलेलं नाटक दाखवू नका अशी धमकीही देऊन जातात. या प्रकरणामुळे सोसायटीमध्ये हे नाटक न दाखवण्याचा निर्णय घेतला जातो. मुलांचा हिरमोड होतो. पण मुलं एक युक्ती करून या समस्येतून मार्ग काढतातच याशिवाय मोठ्यांच्या डोळ्यात नकळत अंजन घालतात. ते कसं यासाठी सिनेमा पहावा लागेल.

दिग्दर्शन
लहान मुलं सिनेमात असतील तर दिग्दर्शकाची परीक्षा असते असं म्हटलं तर चुकिचं ठरणार नाही. कारण लहान मुलांकडून काम करवून घेणं यात दिग्दर्शकाचा कस लागतो. निपुण धर्माधिकारीला हे कसब उत्तम जमलं आहे. मुलांच्या नजरेतून दिसणारं मोठ्यांचं जग, त्यांना पडणारे प्रश्न, त्यांची मस्ती-कुस्ती, धमाल आणि यंत्रांच्या जगात वावरताना मनात जपलेली संवदेनशीलता या सगळ्याचा प्रत्यय धप्पा पाहताना येतो. दिग्दर्शनासाठी निपुण धर्माधिकारीला पूर्ण गुण द्यावे लागतील.
अभिनय
लहान मुलांचा अभिनय या सिनेमाचा युएसपी आहेच. मुलाचं काम कृत्रिम न वाटता नैसर्गिक वाटतं ते यामुळेच. याशिवाय मुलांच्या पालकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या वृषाली कुलकर्णी, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत काळे, इरावती हर्षे यांनीही आपल्या भूमिका अगदी चोख निभावल्या आहे.
सिनेमा का पाहावा?
ब-याच दिवसांनी गंभीर विषय आणि हलकी फुलकी मांडणी असलेला सिनेमा निपुण धर्माधिकारीने रसिकांच्या भेटीला आणला आहे. लहानांनी मोठ्यांना हसवत मारलेल्या कोपरखळ्या अंतर्मुख करतात. सशक्त पटकथा आणि नेटकी मांडणी यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो.

https://www.youtube.com/watch?v=DAvz3B2KsoI

Recommended

PeepingMoon Exclusive