By  
on  

मुंबईत असा रंगला 'टाईम्स मराठी फिल्म आयकॉन' सोहळा , पाहा क्षणचित्रे

संपूर्ण जगाला हेवा वाटावा, असे चित्रपट मराठी भाषेत तयार होत आहेत. या चित्रपट निर्मितीमध्ये कलाकारांपासून स्पॉट बॉयपर्यंत सर्वांचीच मेहनत दडलेली असते. याच मेहनतीची दखल घेऊन भारतातील अग्रगण्य वृत्तसमूहाने 'टाईम्स मराठी फिल्म आयकॉन २०१९' नावाने पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.

 

ज्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास अपूर्ण राहील, असे विनोदवीर अशोक सराफ, मराठी सिनेसृष्टीला 'एकापेक्षा एक' धमाल चित्रपट देणारे सचिन पिळगावकर, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार आणि  निर्माते महेश मांजरेकर यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त या पुरस्कार सोहळ्यात  सुबोध भावे, अमृता खानविलकर, अजय -अतुल, गुरु ठाकूर, आदर्श शिंदे, विक्रम गायकवाड, महेश लिमये आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 "हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाची पावती आहे. आपण जे काम करतोय ते लोकांना आवडते का, याचा विचार करत होतो आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर असे वाटतेय, की लोकांना माझे काम आवडते. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो ", अशा शब्दांत अशोक सराफ यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.  तर सचिन पिळगावकर यांनी पुरस्कार दिल्याबद्दल 'टाईम्स'चे आभार मानत ३१ वर्षं पूर्ण झालेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी विजू खोटे यांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली.

ज्यांचे संगीत कानावर पडताच आपोआप थिरकायला लावणारे आणि मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर नाचवणारे अजय - अतुल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांनी 'टाईम्स'चे आभार मानत आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना 'येड' लावले.या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात अदिती भागवत यांच्या गणेश वंदनाने झाली. याशिवाय अनेक कलाकारांच्या नृत्याविष्काराने सोहळ्याला चारचाँद लागले. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच 'भाडीपा'च्या टीमने या सोहळ्यात स्टॅंडप कॉमेडी सादर करत उपस्थितांना खळखळून हसवले.

तर प्रियांका बर्वे हिने आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली. कलेच्या विविध सादरीकरणाने सोहळ्याला रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले. या वेळी प्रसाद ओक, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, श्वेता शिंदे, जयवंत वाडकर, राजेश म्हापुस्कर, वैशाली सामंत, सायली संजीव, अशोक शिंदे , श्रेयश जाधव, सुनील पाल, रीना अग्रवाल आदी कलाकारांची उपस्थिती होती.

या सोहळ्याला टायटल स्पॉन्सर म्हणून 'टॉप स्कॉलर'चे संजय साळुंखे, पॉवरर्ड बाय श्रीमती शालिनी ठाकरे, को-पॉवरर्ड बाय 'गणराज असोसिएट्स'चे पुरुषोत्तम जाधव, डिजिटल पार्टनर प्लॅनेट मराठीचे अक्षय बद्रापूरकर, पीआर पार्टनर औदुंबर एंटरटेनमेंट्स, व्हेन्यू पार्टनर हयात रिजेंसी, बेव्हरेज पार्टनर युनाइटेड बेव्हरेज लिमिटेड, लिव्हिंग लिक्वीड्झ आणि फोटोग्राफर नंदू धुरंधर यांची साथ लाभली आहे.

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive