By  
on  

Exclusive: 150 वर्षांपासूनचे मुखवटे आणि उदंड उत्साह...... अभिनेत्री सायली संजीव सांगतेय तिच्या गौरींविषयी....

दोन दिवसांपुर्वीच सगळीकडे उत्साहात बाप्पांचं आगमन झालं. आता बारी आहे ती माहेरवाशिणी गौरींची. घरोघरी आज सौभाग्यलेण्यांसहित गौरींचं आगमन झालं. गौरींच्या येण्याने गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. अभिनेत्री सायली संजीवनेही तिच्या गौरींविषयी पीपिंगमून मराठीच्या चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

 

गौरी तयारी आणि उत्साहाबाबत सांग 

गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे उत्साहाचा माहोल सगळीकडे असतो. माझ्यासाठी हा सण खुपच खास आहे. याला कारण आहे आमच्या घरच्या गौरी. आमच्या घरच्या गौरीला जवळपास 150 किंबहुना त्याहीपेक्षा जास्तच वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या गौरींचे मुखवटेही तितकेच जुने आहेत. विशेष म्हणजे हे मुखवटे शाडूच्या मातीचे आहेत. अनेकदा त्यावर मी रंगकामही केलं आहे. या गौरीची मांडणी करतानाही तितकंच कौशल्याने करावी लागते. त्याच्या विशिष्ट साच्यात साडी नेसवणे, योग्य नि-या करणे हे सगळं झाल्यावर त्या साच्याला कापडी हात जोडले जातात. या गौंरींचे दागिने खुप वैशिष्ट्य पुर्ण आहेत. पुर्वीच्या काळी असलेल्या पितळी नाण्यांपासून या गौरींचे दागिने बनवले आहेत. त्यामुळे गौरींइतकेच त्यांचे दागिनेही जुने आहेत. 

 

शुटिंग दरम्यान सेटवर कधी गणोशोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली होती का? 

‘काहे दिया परदेस’ च्या वेळीच मला सेटवर गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. त्यावेळी गणेशोत्सवा दरम्यानचे सीन शुट करण्याची संधी मिळाली. अर्थातच या उत्सवातही घरच्या गणपती इतकाच उत्साह असतो. खास नैवेद्यापासून सगळ्या गोष्टी आवर्जून असतात . 

 

करोनापुर्वीच्या गणशोत्सवातील कोणती गोष्टीला मिस करते आहेस? 

मी सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीला मिस करत असेन तर मिरवणूका. या शिवाय करोनापुर्वीच्या दिवसात मंडळांना भेट देणे. मग तो लालबागचा राजा असेल किंवा चिंचपोकळीचा असो किंवा नाशिकची काही असतील. या मंडळांमधला वेगळाच माहोल मी या काळात मिस करते आहे. 

 

 

बाप्पाकडे यंदा काय मागशील ? 

अर्थातच, सगळे जे मागत आहेत तेच मी मागेन. ही सध्याची करोनाची परिस्थिती जाऊ दे आणि सगळं पुर्ववत होऊ दे. कारण सध्याची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे मी बाप्पाकडे दुसरं काहीच मागणार नाही. 

 

आगामी प्रोजेक्टबाबत शेअर करु शकशील का? 

सध्या एक छोटूसा ब्रेक घेतला आहे मी. प्रोजेक्टस आहेत काही हातात पण ते ब्रेकनंतर असतील. गणपतीचे दिवस आई-बाबासोबत वेळ घालवेन. मला येत्या काळात वेबसिरीजमध्ये काम करायला नक्कीच आवडेल.

Recommended

PeepingMoon Exclusive