By  
on  

Peepingmoon Exclusive : गौरींना सजवणं हे मेडिटेशनसारखंच असल्याचं सांगतेय अभिनेत्री समिधा गुरु

कालच सगळीकडे उत्साहात गौरींचं आगमन झालं. बाप्पाच्या येण्याने झालेला आनंद गौरींच्या येण्याने दुप्पट होतो. गौरींची सजावट, मान-पान यात दोन दिवस कसे सरतात समजतही नाही. अगदी दोन दिवसात मिळालेला हा आनंद वर्षभराची उर्जा देऊन जातो. अभिनेत्री समिधा गुरुनेही या उत्सवातील तिच्या आनंदाविषयी चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

गौरीची तयारी आणि उत्साहाबाबत सांग

खरं तर मुंबईतील गौरी या माझ्या बहिणीकडे असतात. पण माझं आणि गौरींचं खास नातं आहे. याला कारण आहे मी नागपूरला असताना बारावीत असल्यापासून सगळ्या नातेवाईकांकडे गौरी तयार करण्यासाठी जायचे. दिवसाला 3 ते 4 गौरी माझ्याकडून बसवल्या जायच्याच. माझ्या घरी गौरी नसल्यातरी आजपर्यंत यात कोणताही खंड पडलेला नाही. मुंबईत आल्यापासून बहिण मृणाल देशपांडेकडे मी दरवर्षी गौरीचे दोन दिवस असतेच. त्यामुळेच आम्हा दोघी बहिणींचं गणेशोत्सवातील ज्येष्ठा- कनिष्ठाशी खास नातं आहे. 

 

 

 

शुटिंग असताना हे सगळं कसं मॅनेज करतेस ? 

माझ्या स्वत:च्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे घरचं आणि गौरींचं अशा दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. या दरम्यान शुटिंगवालेही अ‍ॅडजस्ट करतात. पण बाप्पासारखे लाडके पाहुणे घरी असतात त्यावेळी हा क्षीण नाहीसा होतो. बाप्पा आणि गौरींसाठी ही एनर्जी आपोआप येते असं म्हटलं तरी चुकिचं ठरणार नाही. या गौरी नटवण्याची मज्जा वेगळीच असते. आम्ही विदर्भातील असल्याने विशेषत: उभ्या गौरी असतात. यावेळी मुखवटे रंगवणे, साड्या नेसवणं हे माझ्यासाठी मेडिटेशनच आहे. 

 

शुटिंग दरम्यान साजरा होणा-या गणेशोत्सवाची धमाल सांग 

सेटवर साजरा होणारा गणेशोत्सव खुपच धमाल आणतो. सध्या अजूनही बरसात आहे या मालिकेच्या सेटवर उमा ताईंनी सगळ्यांसाठी मोदक मागवले. त्यामुळे या दिवसात सेटवरही उत्साही वातावरण असतं. 

 

 

यावर्षी बाप्पाकडे काय मागशील ? 

जी काही परिस्थिती समोर आहे ती एकप्रकारची शिकवण आहे. बाप्पाला मी असं सांगेन की, ही शिकवण कायमच लक्षात ठेवून वागू. प्रकृतीचा आदर करुन वागलं तर नक्कीच बाप्पाही खुश होईल. यावर्षी मी घरीही रंगमंचाचा देखावा केला आहे. आमच्या सगळ्या कलाकारांची पोटं यावर आहेत. आता बाप्पाच्या चरणी हेच सांगणं आहे की सगळं सुरळीत सुरु होऊ दे 

Recommended

PeepingMoon Exclusive