आयुष्यमान खुरानाचा आगामी 'बाला' आणि सनी सिंहचा आगामी 'उजडा चमन' मध्ये सुरु असलेली स्पर्धा काही नवीन नाही. विषयामध्ये समानता असलेल्या या दोन सिनेमांच्या ट्रेलरमध्येही सारखेपणा होता. परंतु आता फिल्ममेकर्सने हा विषय जास्त न ताणता आपल्या सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. याआधी 'बाला' 7 नोव्हेंबर आणि 'उजडा चमन' 8 नोव्हेंबरला रिलीज होणार होता. परंतु आता या दोन्ही सिनेमांमध्ये होणारी टक्कर टाळण्यासाठी 'उजडा चमन'च्या मेकर्सने 1 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता 'बाला'ची सुद्धा रिलीज डेट बदलली गेली असल्याची चर्चा आहे.
पिपिंगमूनला एक्सक्लुझिव्हली कळालं आहे की दिनेश विजन दिग्दर्शित 'बाला' 'उजडा चमन'च्या एक दिवस आधी 31 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 'बाला' ची रिलीज डेट आधी 2 नोव्हेंबर करण्याचा निर्णय होता. परंतु नंतर त्यांनी हुशारीने 31 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
'उजडा चमन'चे दिग्दर्शक अभिषेक यांनी 'बाला'च्या निर्मात्यांवर काॅपीराईटचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 'बाला'चं प्रदर्शन रोखण्याची याचिका त्यांनी दाखल केली आहे. आता या याचिकेनुसार 'बाला'बाबत कोणता निर्णय घेण्यात येईल हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे.
'बाला' मध्ये आयुष्यमान, यामी गौतम आणि भुमी पेडणेकर महत्वपुर्ण भुमिकेत आहेत. तर अभिषेक पाठक दिग्दर्शित 'उजडा चमन' मध्ये सनी सिंह आणि मानवी गागरु झळकत आहे.