सध्या बॉलिवूडमध्ये रिमेकचा सीझन आहे. अशा वेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तर कसे मागे राहतील. त्यांनीही एका तमिळ सिनेमाचं हिंदीमध्ये रिमेक करण्याचं ठरवलं आहे. या सिनेमात संजय भाची शर्मिन सेगलला लाँच करणार आहेत. विशेष म्हणजे शर्मिनसोबत या सिनेमात आणखी एक न्युकमर आहे. या सिनेमात जावेद जाफरींचा मुलगा मिझान जाफरीही या सिनेमातून पदार्पण करणार आहे.
‘मलाल’ असं नाव असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार निर्माते दिग्दर्शक मंगेश हाडवळे करणार आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या वृत्तानुसार मलाल हा सिनेमा प्रसिद्ध तमिळ सिनेमा ‘७ जी रेनबो कॉलनी’ चा रिमेक आहे. मंगेश यांनी सिनेमाच्या पटकथेचं लेखन पूर्ण केलं आहे. हा सिनेमा संजय यांच्या मागील सिनेमांप्रमाणे भव्य-दिव्य नसेल तर एक सरळ-साधी लव्हस्टोरी असेल. साऊथ इंडियन कधीर आणि नॉर्थ इंडियन अनिता यांची लव्हस्टोरी तमिळ सिनेमात दाखवली गेली होती.
सिनेमाचं ५० टक्के शुटिंग झालं आहे. शर्मिन आणि मिझानचं पदार्पण धडाक्यात व्हावं अशी संजयलीला भन्साळींची इच्छा आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मितीमध्ये ते कोणतीही कसर बाकी ठेवू इच्छित नाहीत.
तमिळ सिनेसृष्टीमध्ये कमालीचं यश मिळवलेल्या या सिनेमाच्या रिमेकसाठी यापूर्वी विवेक ओबेरॉयची निवड केली होती हा सिनेमा मणिरत्नम हे बनवणार होते. पण हा प्रोजेक्ट काही कारणास्तव बंद पडला.
आता संजयलीला भन्साळींच्या या सिनेमाला कितपत यश मिळतं ते पाहू.