बॉलिवूडची आज खुप मोठी हानी झाली. इरफानसारखा अष्टपैलू अभिनेता हरपला. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात आज सकाळी इरफानने शेवटचा श्वास घेतला. दमदार अभिनयाने सर्वांना जिंकून घेणा-या एका लढवय्या अभिनेत्यानं कायमची एक्झिट घेतली. कसदार अभिनयातून... संवादफेकीतून प्रेक्षकांच्या मनावर 'इरफान खान'नाव कोरुन तो निघून गेला...त्याच्यासारखा तोच...असा नट पुन्हा होणे नाही.
पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, आज सकाळी आयसीयूमध्ये शेवटच्या घटका मोजताना इरफानला त्याची दिवंगत आई दिसत होती. इरफानची आई सईदा बेगम यांचं २५ एप्रिल रोजी जयपूरमध्ये निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांना जाऊन अवघे तीनच दिवस झाले होते, तोच मुलगा इरफान खाननेसुध्दा जगाचा निरोप घेतला. करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन असल्याने इरफानला आईचं शेवटचं दर्शनही घेता आलं नव्हतं. तो त्याच्या आईच्या खुप जवळ होता. पण उपचारासाठी त्याला बराच काळ परदेशात काढावा लागला होता.
आज सकाळी कोकिलाबेन रुग्णालयात जेव्हा इरफान जीवन-मरणाशी झुंज देत होता, तेव्हा त्याच्या पत्नी सुतापाला सांगितलं, अम्मा इथेच आहे, माझ्याजवळ. बघ इथे बाजूलाच बसलीय आणि मला घेऊन जायला आलीय. हे ऐकून सुतापा ढसाढसा रडू लागली. एकंदरच कॅन्सरशी लढताना व शेवटच्या घटका मोजताना इरफानला आईची प्रचंड आठवण येत होती व त्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला.
हरहुन्नरी कलावंत इरफानच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.