सिनेसृष्टीवर दोन दिवस काळाचा घाला पडला. हरहुन्नरी अभिनेता इरफान खानला गमावल्यानंतर आज बॉलिवूडला आपल्या दमदार अभिनयाने समृध्द करणारे ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. लागोपाठ हे दोन आघात कलाविश्वावर झाले. खुप मोठी पोकळी बॉलिवूडमध्ये आता निर्माण झाली आहे. कॅन्सरशी झुंज ऋषीजींची अपयशी ठरली.
सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या, माहितीनुसार बुधवारी रात्री उशीरा ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूरला आयसीयूमध्ये बोलावलं. त्यांच्या पलंगाशेजारी बसायला सांगितलं. तर पत्नी नितू कपूर या सतत ऋषी कपूर यांच्यासोबतच असायच्या. कोणालाही त्यांना भेटायची परवानगी डॉक्टरांनी दिली नव्हती. तर त्यांची लेक रिध्दीमा कपूर सहानी ही दिल्लीत वास्तव्यास आहे.
करोना संकट देशावर ओढवल्यामुळे सार्वजनिक वाहतूक सध्या बंद असल्याने रिध्दीमा ही वडिलांच्या अंत्यदर्शनापासून वंचित राहणार आहे. तर लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी आलिया व रणबीर ऋषीजींची भेट घेऊन आले होते. त्यानंतर काल रात्री उशीरा ऋषी यांनी रणबीरला आयसीयूत आपल्याजवळ बोलावलं. त्यानंतर आज सकाळी ८.४५ वाजता त्यांनी आपले प्राण सोडले.