बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात काल १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. यशाच्या शिखरावर असताना, अनेक सिनेमे पदरात असताना सुशांतने असे पाऊल का उचलले? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. वयाच्या ३४व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतला. सिनेसृष्टीसह त्याच्या आत्माहत्येच्या बातमीने संपूर्ण देश हादरला.
आज त्याच्या अंत्यंसंस्कारासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब हे पटनाहून मुंबईत दाखल झालं आहे. आज सायंकाली ५ वाजता विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत सुशांतवर अंत्यसंस्कार होणार आहेत. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील फक्त आठ लोकांनाच या अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यात सुशांतचे बाबा के. के सिंग , त्याचा चुलत भाऊ आणि बिहारचा खासदार असलेला नीरज सिंग बबलू आणि त्याची बायको, दोन मुलं हे काल मध्यरात्रीच विमानाने मुंबईत दाखल झाले. तसंच सुशांतच्या दोन बहिणी रितू आणि मितू व मेहूणा ओमप्रकाश सिंह उपस्थित राहतील.
रितूचे पती ओमप्रकाश सिंह हे हरियाणामधील आयपीएस ऑफीसर आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे स्पेशल ड्युटी ऑफिसर आहेत. ते आता चंदीगढ येथून मुंबईत आले आहेत.
सध्याचा लॉकडाऊन काळ व करोनाच्या परिस्थितीमुळे सुशांतच्या कुटुंबातील फक्त ८ जणांनाच यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सुशांतचं पोस्ट-मार्टेम आज सकाळी ८ वाजता कूपर रुग्णालयात पूर्ण झालं. तीन डॉक्टरांच्या टीमने हे पोस्ट-मार्टेम पूर्ण केलं असून त्याचं चित्रणही करण्यात आलं आहे.
प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचंच निष्पन्न झालं आहे.