करोना संकटामुळे जवळपास दोन महिन्यांच्यावर मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याचे संकेत दिले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला.
आता लवकरच सर्वांच्या मालिका पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आणखी एक आनंदाची बाब म्हणजे टेन्शन विसरुन हसायला शिकवणारा सर्वांचा लाडका कार्यक्रम द कपिल शर्मा शो ह्या कार्यक्रमाची शूटींग येत्या २४ जूनपासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती आहे. तसंच नुकतंच पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार अभिनेता सोनू सूद हा कपिलच्या लोकप्रिय शोच्या पहिल्या भागात पाहुणा म्हणून हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. पण सेटवरचे क्रू मेंबर्स, इतर तंत्रज्ञ यांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच हा कार्यक्रम सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
तसंच कोविड-१९ या प्रखर समस्येभोवतीच या कार्यक्रमाची आगामी कॉन्सेप्ट डिझाईन करण्यात येत असल्याची माहिती आहे. स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्याच्या कार्याची माहिती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. सोनू आणि त्याची टीम लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहचवण्याची व्यवस्था अहोरात्र करत आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या प्रवासातल्या खाण्या-पिण्याचीसुध्दा सोय त्याने केली आहे. तरीही आपल्या कामाची कोणतीही अवास्तव प्रसिद्धी तो करताना दिसत नाही. तो आपसूकच प्रसिध्दी झोतात आला, पण त्याला त्याची हौस नाही.म्हणूनच तो कपिलच्या शोच्या पहिल्या भागात पाहुणा म्हणूनयेऊ शकतो. नेहमी सिनेमाचं प्रोमोशन इथे होतं पण यावेळेस आगळी वेगळी कॉन्सेप्ट येथे पाहायला मिळू शकते असं सूत्रं सांगतात.