स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ... ‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’ असे तिचे म्हणणे आहे” आणि याचमुळे स्वभवाने चांगली असून देखील वयाच्या चौतीसाव्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे... अशाच स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं... दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं... जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो.... आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात... या दोघांचे आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पुर्णपणे बदलून जाणार ? स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात नक्की काय घडणार ? हे आपल्याला चंद्र आहे साक्षीला ह्या नव्या-को-या मालिकेतून अनुभवता येईल.
बर्याच काळानंतर अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा ह्या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय.
मालिकेचा निर्माता आणि लेखक चिन्मय मांडलेकर म्हणाला, "चंद्र आहे साक्षीला’ ही मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित पहिली मालिका आहे. मी आणि माझा मित्र सुप्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आम्ही दोघांनी मिळून ही संस्था सुरू केली... लॉकडाउननंतर नव्या गोष्टी घेऊन पुन्हा यायचं असं जेव्हा कलर्स मराठी वाहिनीने ठरवलं तेव्हा त्यांनी आम्हाला ही संधी देण्याचे ठरवले त्यासाठी मी वाहिनीचा ऋणी आहे... या मालिकेच्या निमित्ताने माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुप्रसिध्द अभिनेता आणि माझा पहिला सहकलाकार सुबोध भावे सोबत इतक्या वर्षांनंतर निर्माता आणि अभिनेता या नात्याने आम्ही दोघं एकत्र येत आहोत... सुबोधने आजवर अतिशय चोखंदळपणे मालिकांची निवड केली आहे आणि हेच कारण असावं त्याने या मालिकेचा विषय, श्रीधरची भूमिका ऐकताच होकार दिला... मालिकेमधील इतर कलाकार देखील गुणी आहेत सगळ्यात महत्वाची आमच्या मालिकेची नायिका ऋतुजा बागवे उत्तम अभिनेत्री आहे... मालिकेमध्ये अनेक उत्तम कलाकरांची फौज आहे यासगळ्यांना घेऊन आम्ही प्रेक्षकांना एक चांगली गोष्ट सांगू पाहतो आहे. कलर्स मराठीसोबत गेल्या चार वर्षांपासून माझी ही सलग तिसरी मालिका आहे जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी या मालिका मी लेखक म्हणून करत आहे, या दोन्ही मालिका प्रचंड गाजत आहे याचा मला आनंद आहे... ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे”.
आपल्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला, “मालिकेविषयी सांगायच झालं तर मला असं वाटत ईच्छा असते पण ती पूर्ण करण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. काही रुळलेल्या वाटा शोधतात तर काही स्वत:च्या निर्माण करतात”.
प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे.... काहींना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, तर काहींची मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. पण, प्रेमाच्या या हळुवार, सुंदर नात्याभोवती जेव्हा विश्वासघाताच कुंपण येतं तेव्हा माणसाची होरपळ सुरू होते. आपल्याच आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिकडून तो झाला आहे याचा जेव्हा संशय येतो तेव्हा कशी ती व्यक्ति स्वत:ला सांभाळते आणि पुढे जाते ? हा प्रश्न समोर येतो. या मालिकेतील स्वाती आणि श्रीधरची प्रेमकथा काहीशी अशीच आहे... कसा असेल यांचा प्रवास ? असं कोणतं रहस्य आहे ज्याने या दोघांचे आयुष्य बदलून जाणार आहे? या हळुवार प्रेमकहाणीची सुरुवात होणार आहे तुमच्या साक्षीने तेव्हा नक्की बघा ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर.