देवी सिंग उर्फ डॉ. अजितकुमारच्या हुशारीला दाद द्यावीच लागेल. 10 खून करुन ती पचविण्याची हिंमत बाळगणारा कोर्टात प्रत्येक साक्षी पुरावे फिरवून लावत स्वत:ची केस चतुराईने लढणारा हा माणूस नावालाच काळिमा आहे. इन्स्पेक्टर दिव्या सिंग आणि सरकारी वकील आर्या ह्यांनी देवी सिंगला फासावर लटकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केले, परंतु ते सर्वच निष्फळ ठरले. देवी सिंग निर्दोष सुटला.
देवीसिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव पुन्हा एकदा गावात आणि त्याच्या दवाखान्यात परतला आहे. तसंच चंदाच्या येण्यानं तो बिथरला आहे.चंदा त्याला आपल्या तालावर चांगलंच नाचवतेय. तिच्यासोबत त्याने वागलेल्या प्रत्येक गोष्टीचा ती हिशोब घेणार आहे. देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत पुढं काय होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत असली तरी पुन्हा तेच चक्र सुरु झाल्याने मालिकेचा शेवट कधी आणि कसा होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
कारण मालिकेत नव्या स्त्री पात्राची एन्ट्री झालीय आणि अजितकुमार त्या बाईमध्ये नेहमीप्रमाणेच आपलं सावज हेरतोय. त्यामुळे कथानक पुन्हा नेहमीप्रमाणेच फिरायला लागल्याने प्रेक्षक चक्रावले खरं पण आता मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं नक्की झालं आहे.'ती परत आलीये' मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे. देवमाणूसच्या वेळेत आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ किंवा १५ ऑगस्ट रोजी देवमाणूस मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.