छोटा पडदा म्हटलं की इथे, सर्व टीआरपीचा खेळ चालतो. एखादी मालिका किंवा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण त्यांच्या यशाची आणि तग धरुन राहण्याची दोरी ही प्रेक्षकांच्याच हातात असते. प्रेक्षकांना तो कार्यक्रम आवडला तर तो तीन-चार वर्षही चालतो, पण नाही पटला तर त्याला दोन-तीन महिन्यातच गाशा गुंडाळावा लागतो. असंच काहीसं या मालिकांसोबतही झालं. काही मालिका या एक-दोन वर्ष मनोरंजन करुन आता प्रेक्षकांचा निरोप घेतायत.
आता तर लॉकडाऊनंतर अनलॉकमध्ये महाराष्ट्रात चित्रिकरणाला परवानगी दिल्याने अनेक नव्या मालिका नव्या कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आधी सुरु असलेल्या मालिकांच्या कमी टीआरपीमुळे त्यांना नारळ देण्यात येतोय.
देवमाणूस ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्यावर्षभरापासून या थ्रीलर मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. अभिनेता किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे.
सई-आदित्यची प्यारवाली लव्हस्टोरी आणि जोडीला चार मामांची धम्माल टोळी अशी माझा होशील ना ही झी मराठीवरील मालिकासुध्दा प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 'माझा होशील ना' या मालिकेच्या जागी येत्या ३० ऑगस्ट पासून 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका प्रसारित होणार आहे.
'कारभारी लयभारी' या मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांना याड लावलं होतं. लयभारी प्रोमो पाहून प्रेक्षक पार वेडे झाले होते. पण मालिका सुरु झाल्यावर तिला अपेक्षित टीआरपी मिळू शकला नाही. राजकारणावर प्रेम करणारा, पण प्रेमात कधीही राजकारण न आणणारा 'कारभारी लयभारी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली.
सोनी मराठी वाहिनीवरील 'आई माझी काळुबाई' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.
लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सूनबाई' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या मालिकेची अफाट लोकप्रियता पाहायला मिळते. दरवेळी सासू-सुनेचं भांडण असणारी मालिका साऱ्यांनीच पाहिली. परंतु, या मालिकेत सूनेला पाठिंबा देमारी सासू पाहायला मिळाली.
'पाहिले न मी तुला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका मागे पडत असल्यानं निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. शशांक केतकर, तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.