‘ती परत आलीय’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका सुरु होऊन जेमतेम दोन आठवडे झाले आहेत. पण या मालिकेने पहिल्या भागापासूनच मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण करत त्यांना खिळवून ठेवलं आहे. अल्पावधितच ही मालिका रसिकांच्या पसंतीस पडतेय. एका जंगलातल्या निर्जन रिसॉर्टवर दहा वर्षांनी भेटलेला कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. त्यांच्यासोबत दहा वर्षांवूर्वी झालेली ती हादरुन टाकणारी गोष्ट. तो नकोसा वाटणारा भूतकाळ आणि आता इतक्या वर्षांनी भेटल्यावर सुरु झालेलं अनपेक्षित घटनांचं चक्र यामुळे हा ग्रुप पूर्ण कोलमडला आहे.
पार्टी ऐन रंगात असताना लघुशंकेसाठी रिसॉर्टबाहेर गेलेला अभयच्या पाठीत कुणी तरी चाकू घुसवल्याने त्याचा खुन होतो. त्यामुळे सारेच घाबरुन जातात. पण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला होऊ नये म्हणून त्यांची धडपड सुरु होते. अभ्याची डेडबॉडी लपविण्यासाठी सर्वचजण एकजुटीने काम करतात.पण जंगलक्षेत्रात बेकायदेशीर घुसल्याच्या आरोपावरुन पोलिस त्यांच्या रिसॉर्टवर धाड टाकत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावतात. आता अभ्याची डेडबॉडी तिथे ठेवणं धोकादायक म्हणून लवकरात लवकर त्याची व्हिलेव्हाट करण्याच्या विचारात हा ग्रुप असतानाच तांडेलच्या कल्पनेने ती बॉडी रिसॉर्टजवळच जंगला मोठठा खड्डा खणून पुरण्यात येते. पण अचानक ती बॉडी गायब झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणतात, अभ्या खरंच जीवंत झाला का, त्याची डेडबॉडी कुठे गेली याच्या शोधात सर्वचजण असतानाच त्या खड्यात पोलिस अधिकारी वर येताना दिसतो. तेव्हा सायली जोरात किंचाळते त्यामुळे आता पुढच्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.