छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक होतेय. या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील विविध घडामोडींनी वेग घेतलाय. आज्जीची तब्येत आणि सणवार यामुळे अरुंधती देशमुखांच्या घरीच राहतेय. संजनाचा घरातल्या माणसांवर रुबाब चालवण्याची एकही संधी सोडत नाहीय.
गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्याने देशमुखांच्या घरात मंगलमय वातावरण आहे. त्यातच अभिषेक आणि अनघाने आपल्या नात्याची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच अरुंधतीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दरम्यान गणेशोत्सवात घरात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भजनीमंडळातील महिला अरुंधतीला भजन गाण्याचा आग्रह धरतात. ती सुरेल भजन गायला सुरुवात करते, तोच अनिरुध्द टाळ वाजवून तिला छान साथ देतो आणि दोघेही भजनात दंग होतात.
इतक्यात हे सर्व पाहून नेहमीप्रमाणे संजनाचा तिळपापड होतो. अनिरुध्दची बायको मी आहे, तरीसुध्दा तो अरुंधतीसोबत काय करतोय, हे ति स्वत:शीच पुटपुटते. पुढे संजना कशी रिएक्ट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.