By  
on  

आई कुठे काय करते: आशुतोषच्या मदतीने अरुंधती रेकॉर्ड करणार पहिलं गाणं

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे.

गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका म्हणून समोर येणार आहे. आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. मालिकेतला हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या आजिवासन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला.

'मोरपंखी चाहुलींचे

सोबतीने चालणे

अंतरावर पसरलेले

टिपूर से सुखाचे चांदणे...' असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी ते लिहिलं आहे. सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायिका विद्या करलगिकर यांनी गायलं आहे.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना मधुराणी म्हणाल्या, 'खूप छान वाटतं आहे. मला जेव्हा १० वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मिळाली तिच आनंदाची भावना अरुंधती आता जेव्हा तिचं पाहिलं गाणं रेकॉर्ड करतेय तेव्हा आहे. आजिवासन स्टुडिओ मध्ये येता क्षणीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १२ वर्षांपूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचं मी संगीत दिग्दर्शन केलं होतं तेव्हा रोज यायचे. आज या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा योग जुळून आला. मी या वास्तु मध्ये पाय ठेवताच खुप भरून आलं. खूप आठवणी ताज्या झाल्या. आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होतोय तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'

तेव्हा पाहायला विसरू नका आई कुठे काय करते सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive