By  
on  

नवी मालिका 'तुझेच मी गीत गात आहे'साठी एक दोन नाही तर तब्बल इतकी गाणी झाली रेकॉर्ड

स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेच्या प्रोमोना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोच आहे त्यासोबतच प्रोमोमध्ये वापरण्यात आलेली गाणी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. छोट्या स्वरावर चित्रित झालेलं ‘फुलपाखराच्या पंखावरचे म्या रंग मोजते सारे, मलेच ठाऊक गात गाणे येती हे कुठून वारे’ हे गाणं असो किंवा अभिजीत खांडकेकर म्हणजेच गायक मल्हार कामतवर चित्रीत झालेलं ‘उडून ये फुलपाखरा, उडून ये माझ्या घरा’ ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत.गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली स्वरा आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे असा सुप्रसिद्ध गायक मल्हारचा सांगितिक प्रवास दाखवणारी ही मालिका आहे. त्यामुळे गाणं हा या मालिकेचा आत्मा आहे. या मालिकेसाठी एक दोन नाही तर आत्तापर्यंत तब्बल १८ गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा मानस आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे.

अवधूत गुप्ते,कौशल इनामदार, अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, पंकज पडघन, रोहन-रोहन, चिनार-महेश या आघाडीच्या संगीतकारांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, स्वरा बनसोडे यांच्या सुरांचा साज या गाण्यांवर चढला आहे. रोहिणी निनावे, कौशल इनामदार, अश्विनी शेंडे, श्रीपाद जोशी, दीप्ती सुर्वे, समीर सामंत या दिग्गज लेखकांच्या लेखणीतून ही गाणी साकारली आहेत.

तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी कथानकासोबतच एक सांगितिक पर्वणी असेल. मराठी मालिका विश्वातल्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘तुझेच मी गीत गात आहे ही मालिका म्हणजे अत्यंत भावनाप्रधान गोष्ट आहे जी मनाला भिडते, जी संगीताने बांधली गेली आहे. मराठीसृष्टीतल्या सहा दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी या मालिकेला संगीत दिलं आहे. असा योग याआधी आलेला नाही. यातली गाणी मालिकेची कथा आणि भावना पुढे घेऊन जातात.’

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती ट्रम्प कार्ड स्टुडिओची असून केदार वैद्य ही मालिका दिग्दर्शित करत आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका तुझेच मी गीत गात आहे २ मे पासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive