मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘ठरलं तर मग’. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असेल. स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जुईशी साधलेला हा खास संवाद.
जुई, पुढचं पाऊल मालिका आणि त्यातील तुझं कल्याणी हे पात्र खूप गाजलं. ठरलं तर मग मालिकेतून पुन्हा एकदा पुनरागमन करताना मनात नेमकी काय भावना आहे?
ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील याची खात्री आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील.
कल्याणी सोशिक होती मात्र सायली अगदी प्रोमोपासूनच रडायचं नाही लढायचं म्हणतेय. सायलीचा हा लढा नेमका कश्यासाठी आहे?
अगदी बरोबर. सायली अजिबात सोशिक नाही. कितीही कठीण परिस्थिती असली तरी तिचं आयुष्यावर प्रेम आहे. सायली आणि माझ्यात बऱ्यापैकी साम्य आहे असं म्हणू शकतो. मलाही हार मानायला आवडत नाही. मालिकेचा पहिला प्रोमो पाहूनच अंदाज येतो की वडिलांसारखच प्रेम करणाऱ्या मधुभाऊंनी सायलीला परिस्थितीचा सामना करायला शिकवलं आहे. सायलीचा भक्कम आधार असणाऱ्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अटक होते. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायलीचा संघर्ष सुरु होतो. मालिकेत सायलीचं एक गुपितही आहे. कथानकातून या सर्व गोष्टी हळू हळू उलगडतील. मला खात्री आहे वेगळ्या धाटणीची ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
तुझ्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग ज्याक्षणी तो ठरवलस आता रडायचं नाही तर लढायचं?
आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपण ठरवतो आता रडायचं नाही तर लढायचं. माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग मला आठवतो आणि तो म्हणजे मी अकरावीत नापास झाले होते. मुळात मला कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधून शिकायचं नव्हतं. मला बीएमएम म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडिया मध्येच करिअर करायचं होतं. मात्र ते करण्यासाठी कोणत्याही एका शाखेमधून अकरावी आणि बारावी करणं महत्त्वाचं होतं. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र अकरावीत नापास झाले. मात्र नापास झाल्यामुळे रडत न बसता मी त्यातून सावरले आणि जोमाने अभ्यासाला लागले. मनापासून अभ्यास केला आणि टीवायला असताना मी युनिव्हर्सिटीतून पहिली आले. हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाही.
स्टार प्रवाह परिवारात पुन्हा एकदा सामील होणार आहेस. या परिवारातील सध्याचं तुझं आवडतं पात्र कोणतं आहे? आणि आवडती मालिका?
माझ्या घरी स्टार प्रवाहच्या सगळ्याच मालिका आवडीने पाहिल्या जातात. मला सगळ्याच मालिका आवडतात. आई कुठे काय करते आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र माझ्या आवडीचं आहे. या परिवारात पुन्हा एकदा सामील होताना अतिशय आनंद होतोय.
तू आणि अमित भानुशाली अशी एक नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तुम्हा दोघांची केमिस्ट्री कशी आहे?
अमित आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम करतोय. मॉक शूटला आम्ही पहिल्यांदा भेटलो. आम्ही दोघंही मितभाषी आहोत. त्यामुळे मैत्री व्हायला थोडा वेळ गेला. पण आता आमची छान मैत्री झाली आहे. आम्ही सेटवर खूप धमाल करतो. त्यामुळेच आमचे सीनही खूप छान खुलून येतात.
ठरलं तर मालिकेचं वेगळेपण काय सांगशिल?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी लिहिलेली असते आणि ती कसाही मार्ग काढून आपल्यापाशी येते. या मालिकेच्या बाबतीतही काहीसं असंच म्हणता येईल. मनीध्यानी नसताना या मालिकेसाठी विचारणा झाली. मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं. मुंबईमध्ये जवळपास ७ ते ८ लोकेशन्सवर आम्ही शूट करत आहोत. आमची संपूर्ण टीम गेले चार महिने या मालिकेवर काम करते आहे. मला खात्री आहे कल्याणी इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम प्रेक्षक सायली या नव्या व्यक्तिरेखेला देतील. तेव्हा ५ डिसेंबरपासून पाहायला विसरु नका नवी मालिका ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.