सुप्रसिद्ध अभिनेता यशोमन आपटेला याआधी आपण रोमॅण्टिक हिरोच्या रुपात पाहिलं आहे. मात्र आजवर त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक पात्र तो स्टार प्रवाहची नवी मालिका शुभविवाह मध्ये साकारणार आहे. १६ जानेवारी पासून दुपारी दोन वाजता सुरु होणाऱ्या या नव्या मालिकेत यशोमन मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशची भूमिका साकारणार आहे.
या आव्हानात्मक भूमिकेविषयी सांगताना यशोमन म्हणाला, ‘आतापर्यंत मालिकेत मी रोमॅण्टिक हिरो साकारला आहे. मात्र शुभविवाह मालिकेतील ही भूमिका खऱ्या अर्थाने इमेज ब्रेक करणारी ठरेल. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी वर्कशॉप आहे. आकाशने मानसिक स्थैर्य गमावलं आहे. त्यामुळे वयाने मोठा असला तरी तो लहान मुलासारखा वागतो. आकाशच्या अश्या वागण्यामागे एक कारण दडलेलं आहे. हे कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पहावी लागेल.
आकाश साकारताना नवनव्या गोष्टी आत्मसात करत आहे. म्हण्टलं तर ही भूमिका साकारण्यासाठी बंधन आहेत आणि म्हण्टलं तर नाही. आकाश कोणत्या गोष्टीवर कश्या पद्धतीने व्यक्त होईल हे समजून घेऊन सीन करावा लागतोय. प्रत्येक सीननंतर या पात्रावरची पकड घट्ट होतेय. स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझी पहिलीच मालिका आहे त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. प्रेक्षकांचं हेच प्रेम या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका ‘शुभविवाह’ १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’