स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच प्रेमापोटी आई कुठे काय करते मालिकेने यशस्वीरित्या तीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
यानिमित्ताने अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाली, ‘तीन वर्षांचा हा प्रवास खरच अविस्मरणीय होता. अगदी पहिल्या प्रोमोपासून या मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. अरुंधती आणि देशमुख कुटुंबाच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं आहे ते खरच भारावून टाकणारं आहे. दहा वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने मी मालिका विश्वात पदार्पण केलं. सातत्याने चांगले सीन लिहिले जाणं, ते चांगल्या पद्धतीने दिग्दर्शित केलं जाणं आणि आम्हा कलाकारांकडून ते चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं बळ मिळणं हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झालंय. अरुंधती हे पात्र अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारं आणि उभारी देणारं आहे. या पात्रासाठी माझी निवड होईल असं कधीच वाटलं नव्हतं. सातत्याने तीन वर्ष अरुंधती हे पात्र जगायला मिळतं आहे यासारखा दुसरा आनंद नाही.
अनिरुद्ध म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, ‘आम्हा कलाकारांसोबतच पडद्यामागच्या आमच्या दिग्दर्शक आणि तंज्ञत्र मंडळींचं कौतुक कारण त्यांच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. लेखक मंडळींचे आभार कारण कोरोना काळातही असे प्रसंग लिहिले गेले की निराशाजनक परिस्थितीतून प्रेक्षकांना बाहेर पडायला मदत होईल. रसिक प्रेक्षकांना एकच सांगने असेच आशीर्वाद देत रहा.’
संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसले म्हणाली, माझं संजनावर खूप प्रेम आहे. प्रत्येक गोष्टीवर संजना कशी व्यक्त होईल हे लेखकांच्या मनात पक्क असतं. त्यामुळे हे पात्र साकारताना खूप सोपं जातं. प्रेक्षकांना संजना हळवी वाटते आणि तितकाच तिचा रागही करतात आणि तिच्यावर प्रेमही करतात. एक कलाकार म्हणून हे खूप सुखावणारं आहे.’
आप्पा म्हणजेच किशोर महाबोले म्हणाले ज्या घरात संपूर्ण कुटुंब एकत्र रहातं ते घर नेहमीच बांधलेलं रहातं. तर आजी म्हणजेच अर्चना पाटकर म्हणाल्या की या मालिकेचा सेट म्हणजे माझं दुसरं घर आहे त्यामुळे हे देखमुख कुटुंब खूप जवळचं आहे.
आई कुठे काय करतेमुळे माझं आयुष्य बदलून गेलं आहे. या मालिकेचा सेट म्हणजे दुसरं घर आणि शाळा आहे. जिथे येऊन मी रोज काहीतरी नवं शिकते अशी भावना इशा म्हणजेच अपूर्वा गोरेने व्यक्त केली. तर अभिषेक देशमुख आणि निरंजन कुलकर्णीनेही प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. आई कुठे काय करतेच्या कुटुंबातील नवे सदस्य म्हणजेच आशुतोष, अनुष्का आणि अनघा यांनी देखिल या टीमचा महत्त्वाचा भाग असल्याचा आनंद व्यक्त केला.