स्टार प्रवाहवर १६ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘शुभविवाह’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या मालिकेत विशाखा सुभेदर रागिणी आत्या हे पात्र साकारणार आहेत. स्टार प्रवाहच्या आंबटगोड मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यानंतर जवळपास १२ वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या शुभविवाह मालिकेत दिसणार आहेत.
शुभविवाह मालिकेतील रागिणी आत्या या पात्राविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाल्या, ‘रागिणी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. अनेक घटनांसाठी ती जबाबदार आहे याची तिला जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ती खूप काळजीपूर्वक करते. अतिशय शिस्तप्रिय, लाघवी, प्रेमळ आणि आकाशची काळजी घेणारी अशी ही आत्या आहे. मालिकेच्या निमित्ताने एखादं पात्र जगायला मिळणं आणि त्या पात्रानुसार बदलणाऱ्या भावभावना साकारणं एक कलाकार म्हणून आनंददायी आहे. या कथानकाला सुद्धा अनेक घाटवळणं आहेत. या घाटवळणांवरुन प्रवास करतानाची मजा मी रागिणी आत्याच्या रुपात अनुभवते आहे. ही मालिका करताना मी एकही पदरचं वाक्य घातलेलं नाही. इतक्या छान पद्धतीने आमचे पटकथाकार शिरीष लाटकर आणि संवाद लेखिका मिथीला सुभाष यांनी हे पात्र लिहिलं आहे. त्यामुळे प्रत्येक वाक्य बोलताना त्याचा मागचा पुढचा अर्थ काढावा लागतो. प्रत्येक सीनसाठी रागिणी हे पात्र कसं व्यक्त होईल याचा विचार करावा लागतो. आतापर्यंत प्रेक्षकांची मोलाची साथ मिळाली आहे. प्रेक्षकांचं हेच प्रेम शुभविवाह मालिकेला मिळो हीच इच्छा व्यक्त करेन. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका शुभविवाह १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’