सातव्या मुलीची सातवी मुलगी ही छोट्या पडद्यावरची गूढ रहस्यमय मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनलीय. प्रत्येक एपिसोड गणिक यातील कथानकाची उत्सुकता ताणून धरतेय. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान असल्याने तिला भविष्यात घडणा-या घटनांचे-संकटांचे संकेत मिळतात. त्यामुळेच ती अद्वैतचा जीव वाचवू शकते. रुपालीने बनाव रचून राज्यध्यक्षांच्या घरावर राज्य करायला सुरुवात तर केली पण आता त्याचा शेवट नेत्रा करणार आहे.
रुपाली कट कारस्थानं रचण्यात बिल्कुल मागे-पुढे पाहत नाहीय. नेत्राचं रहस्य जाणून घेण्यासाठी पूर्वाश्रमीच्या नव-याच्या सातीने तिने कालपेटी चोरली आणि ग्रंथ मिळवला. आता ग्रंथातल्या एकेक गोष्टी रुपालीसमोर उलगडत आहेत. नेत्राकडे असलेल्या दिव्यशक्तीची तिला जाणीव झालीय. त्यामुळे रुपाली पुरती बिथरलीय. आता पुढे काय घडणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत.
रुपालीबरोबरच आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या नावामागील खरा अर्थ प्रेक्षकांनाही कळणार आहे. नेत्राची आई ही सातवी मुलगी आणि नेत्रा तिची सातवी मुलगी हा या मालिकेच्या नावामागचा एक अर्थ प्रेक्षकांना माहित आहे.परंतु या नावामागचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा उलगडा रविवारी १२ फेब्रुवारीला मालिकेच्या महाएपिसोडमध्ये होणार आहे. रविवारी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना या मालिकेचा महाएपिसोड पाहता येणार आहे.
सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत उत्तम कलाकारांची फली जमून आलीय. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना पहिल्यांदाच खलनायिका म्हणून पाहायला मिळतायत. त्याचसोबत नेत्राच्या भूमिकेत तितिक्षा तावडे प्रेक्षकांना खुप भावतेय. अभिनेता अजिंक्य ननावरे अद्वैत राजाध्यक्षाच्या भूमिकेत आहे. याशिवाय राहुल मेहंदळे, मुग्धा गोडबोले, अश्विनी मुकादम आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका मालिकेत आहेच.