'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत जयदीपच्या आईची होणार धमाकेदार एण्ट्री

By  
on  

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

जवळपास ३० वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झालीय. सुटका होताच जयदीपटी भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. मंगल म्हणजे जयदीपची आई. ३० वर्ष मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचं ठरवलं आहे. मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक मंगल ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या भूमिकेविषयी सांगताना अतिशा नाईक म्हणाल्या, बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबासोबत जोडली जातेय याचा आनंद आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतलं मंगल हे पात्र साकारताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय. ३० वर्ष कारावासात राहून आलेल्या मंगलची दहशत आहे. तिचा स्वभाव फारच रुक्ष आहे. आपल्या मुलाच्या भेटीसाठी आसुसलेली, आणि ज्यांच्यामुळे मुलगा दुरावला अश्यांना अद्दल घडवू पाहणारी ही मंगल मी साकारणार आहे. अश्या पद्धतीची व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतंच्या परिवारात मी जरी नवी असले तरी सेटवर मला असं कुणी जाणवू दिलं नाही. आता सर्वच सहकलाकारांसोबत माझी छान मैत्री झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. असंच प्रेम मंगल या पात्रालाही मिळेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Recommended

Loading...
Share