वैभव मांगले, सागर देशमुख आणि आभा बोडस अभिनित 'चंद्रविलास' या आगामी मालिकेचे शीर्षकगीत नुकतेच बॉलीवूड ची सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहान हिच्या मधुर स्वरांनी संगीतबद्ध करण्यात आले आहे. सुनिधीने या आधी मराठी चित्रपटासाठी अनेकदा पार्श्वगायन केलेले आहे परंतू 'चंद्रविलास' च्या निमित्ताने सुनिधी प्रथमच एखाद्या मराठी मालिकेसाठी पार्श्वगायन करतेय. अमोल पाठारे यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि प्रणव हरिदास यांनी संगीतबद्ध केलेलं हे शीर्षकगीत गाताना ती खूप उत्साही होती.
‘चंद्रविलास’ ही गोष्ट आहे दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतो, या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा बाप लेकीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.
वैभव मांगलेचा हा नवीन लुक प्रेक्षकांना नक्कीच भावेल यात शंकाच नाही. मालिकेचं लेखन केलंय समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी. तेव्हा पाहायला विसरू नका एक रहस्यमय भयकथा "चंद्रविलास" २७ मार्चपासून रात्री ११ वा. फक्त झी मराठीवर.