सुंदरा मनामाध्येभरली ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांची लाडकी बनलीय. अभी-लतीची जोडी प्रेक्षकांना खुप भावली. जाड असणारी लतिका आणि हॅण्डसम अभिमन्यू ह्यांची ही हटके प्रेमकहाणी प्रचंड लोकप्रिय झाली. नुकतंच या मालिकेची नायिका लतिका या पात्रासाठी अभिनेत्री अक्षया नाईकला सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तिरेखा असा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
पुरस्कार मिळताच अक्षयानं पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात. तिनं म्हटलंय, तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही प्रमुख पात्र व्हा. मला सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला.मला अभिनेत्री व्हायचं होतं. तेव्हा मनात एकच प्रश्न घोळत होता की एखाद्या जाड मुलीला कशा भूमिका मिळतील? सिनेमात फक्त साइड रोल किंवा बर्गर खाणारी एक जाड मैत्रिण किंवा एक जाड मैत्रीण जिची सगळे खिल्ली उडवतील.मला आनंद आहे की मी माझ्या भूमिकेनं अनेक तरूण मुली आणि मुलांच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदत करत आहे. संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वत: काहीतरी निर्माण करा. मला मिळालेल्या पुरस्कारासाठी आणि प्रेमासाठी मी सदैव कृतज्ञ असेन, असं अक्षयानं म्हटलं आहे.'
अक्षयाने ह्या पुरस्कारासाठी प्रेक्षकांना आणि अनेक लतिका असलेल्या मुलींना अर्पण करुन त्यांचेै आभार मानले आहेत. अक्षयाच्या या पोस्टवर चाहते कौतुकाचा आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.