एरवी माझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष वाचता येणारी आई तू… तुला माझ्या डोळ्यातलं दुःख नाही का दिसलं? मुलींच्याच बाबतीत असं का होतं?

By  
on  

स्टार प्रवाहवर ८ मे पासून सुरु होणाऱ्या मन धागा धागा मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुतकता आहे. स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकर या मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार असून अभिनेता अभिषेक रहाळकर सार्थकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शुभांगी लाटकर, निनाद देशपांडे, राजश्री निकम, रमेश वाणी, पुष्कर सरद, नेहा परांजपे, आधीकी कसबे, अश्विनी मुकादम, अमोघ चंदन, प्रणिता आचरेकर, सोहन नांदुरीकर अशी तगडी कलाकारांची फौज या मालिकेत आहे.

घटस्फोटित महिलांकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. समाज तर सोडाच पण घरच्यांकडूनही त्यांना खंबीर साथ मिळत नाही. आनंदीही त्यापैकीच एक. मनात अनेक गोष्टी असताना त्या मनमोकळेपणाने मांडू न शकणारी. आई-बाबांसमोर व्यक्त तर व्हायचंय आणि त्यासाठीच आनंदीने पत्रातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पत्रात आनंदी म्हणते...

 

प्रिय आई बाबा,

घरी सुखरुप पोहोचले. आता तुम्ही म्हणाल मोबाईल असताना हे असं अचानक पत्र का लिहितेय. त्याचं काय आहे...नुकतीच मी आपल्या घरी असताना, सॉरी...आई म्हणते तशी माहेरी पाहुणी म्हणून आले असताना आईला माझी परिस्थिती सांगितली आणि आईने बोलणंच टाकलं.

आई अगं तू, मी समोर आल्यावर नजर ही वळवलीस... म्हणून हे पत्र. खूप बोलायचंय, मन मोकळं करायचंय, काही प्रश्न पडलेत ते ही विचारायचेत. तेव्हा ऐकलं नाहीस पण हे वाच. वाचलंस तर तू ऐकलंस असं वाटेल मला. वाचशील ना? आई, मुलगी जन्माला येते तेव्हा आई-वडील म्हणतात हे परक्याचं धन आहे.. लग्न झालं की  सासरी जाणार तेच तुझं घर आणि भांडण झालं की सासरचे म्हणतात तुझ्या आई वडिलांच्या घरी परत जा.. पण माहेरी तिला आता थारा नसतो..  याचा अर्थ मुलगी जन्मापासून बेघर असते का? तू म्हणतेस ना जेव्हा एखादी मुलगी सासर सोडून माहेरी परत येते तेव्हा सगळे आपसात चर्चा करतात.. कुणाला आश्चर्य वाटतं , कोणाला वाईट वाटतं , कोणाला आनंदही होतो. . बहुतेक जण मुलीलाच दोष देतात... असेल हिच्यातच काहीतरी उणीव.. नवऱ्याशी चांगलं वागत नसेल.. घरात नीट काम करत नसेल.. मोठ्यांचा मान ठेवत नसेल.. नाहीतर असेल लग्नाआधी कुठेतरी प्रकरण.. काहीही माहिती नसताना प्रत्येक जण काही ना काही कारण शोधतो.. . पण ती मुलगी कुठल्या  दिव्यातून जाते आहे याचा कोणीच का विचार करत नाही?

पण जाऊदे, मी सुखात आहे तुम्ही काळजी करु नका. हल्ली अंशुमनला ही उशीर होतो, त्या दिवशी तर एवढा चिडलेला तो. रागात त्याने हातच उचलला माझ्यावर, पुन्हा... पण मी सांभाळून घेतलं. तुम्ही तेच तर शिकवलंय, सहनशीलता! तुम्हाला आठवतंय पाठारे बाईंनी शाळेत मला पट्टी मारलेली म्हणून तुम्ही दोघे भांडायला आलेलात. शाळेत शिक्षकांनी एक पट्टी मारली तरी सुद्धा भांडायला येणारी हीच आई मला सांगते त्यात काय झालं नवऱ्याने जरासं मारलं तर.. सहन करायचं.. ऍडजस्ट करायचं..? एरवी माझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष वाचता येणारी आई तू.. तुला माझ्या डोळ्यातलं दुःख नाही का दिसलं?  मुलींच्याच बाबतीत असं का होतं? असो! वेळेनुसार गोष्टी बदलतात हे मलाही कळलंय.  अंशुमन त्या  दिवशी क्षुल्लक कारणावरून नको नको ते बोलला. म्हणाला 'तुझ्या आई बापाने काही शिकवलं नाही का'?

पण तुमच्या आनंदीने उलट उत्तर दिलं नाही बाबा. तुम्ही हेच शिकवलंय ना? मी वेळ सांभाळून घेतली. तुम्ही काळजी करु नका बाकी सगळं ठिकाय. दादा वहिनी, आणि तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. गेल्या वेळी आलेले तेव्हा दादा धड बोललाही नव्हता. मी परत आले तर, इतकी नाती बदलणार आहे का? कधीकधी वाटतं धावतपळत यावं आणि आईच्या कुशीत शिरावं, तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, दादाशी गप्पा माराव्या. पण आता ते शक्य नाही. कारण, मुलीने माहेरपणाला पाहुणी म्हणून यावं पण सासरी नवरा नांदवत नाही, माणूस म्हणून समजून घेत नाही, अपमान करतो माझा, तुमचा, तुमच्या संस्काराचा तरी स्वाभिमान बाजूला ठेवून आई वडिलांच्या घरी, जिथे आपला जन्म झाला त्या हक्काच्या घरी येऊ नये का??? तर लोक काय म्हणतील

असं का असतं आपल्यात? तुम्हा सगळ्यांचं  पण बरोबर आहे म्हणा, आई वडील बदनाम होतात जर मुलगी नवऱ्याचं घर सोडून आली तर...लोकं म्हणतील आईने शिकवलं नाही वाटतं संसार करायला, भावाला वाटेल हक्क मागेन त्यापेक्षा मी इथेच बरी आहे. होणारा त्रास, मनावरच्या आणि शरीरावरच्या जखमा लपवून, अपमान गिळून मी इथेच राहायचा प्रयत्न करेन कारण आईने तसा आशीर्वादच दिलाय मला दिल्या घरी सुखी राहा! म्हणूनच हे पत्र तुम्हाला लिहतेय पण पाठवत नाहीय. तुम्हाला त्रास नको आणि तसंही अशी अनेक न पाठवलेली पत्र महाराष्ट्रभर असतील. कोणाची मुलगी, मैत्रीण, नणंद, बहीण त्यांच्या असंख्य पत्रांसारखंच माझं पत्र, तुमच्यापर्यंत कधीही न पोहोचलेलं. तुम्हाला असंच वाटत राहू दे मी सुखात आहे, आई बाबा मी सुखात आहे.

तुमचीच,
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share