सध्या लॉकडाऊनमुळे २१ दिवस घरात बसणं अर्निवार्य आहे. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक सेवांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे प्रत्येकाला आता सक्तीने घरी बसावं लागतंय. यादरम्यान जुन्या मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याच्या अनेक मागण्या मागच्या काही दिवसांत यशस्वी ठरल्या. त्यात रामायण, महाभारत, शक्तीमान , ब्योमकेश बॅनर्जी इतकंच नाही तर मराठीत चिमणराव-गुंड्याभाऊ या दूरदर्शनवरच्या सर्व मालिका रसिकांच्या भेटीला आल्या.
पण खासगी वाहिन्यांच्या प्रसिध्द मालिका पाहण्याची सुवर्णसंधीसुध्दा या दरम्यान प्रेक्षकांना मिळतेय. छोट्या पडद्यावरील स्वराज्यरक्षक संभाजी, जय मल्हार, राजा शिवछत्रपती या गाजलेल्या मालिकांसह लवकरच प्रेक्षकांची लाडकी आणि कोकणात चित्रित झालेली रहस्यमयी रात्रीस खेळ चाले भाग पहिला पुन्हा प्रक्षेपित होत आहे. या बातमीने प्रेक्षकांना खुपच आनंद होतोय.
पहिल्या भागात शेवंता व अण्णा नाईकांची केमिस्ट्री नसली तरी ‘इसरलंय...’म्हणणारा पांडू आहे. ‘हो...हो..हो ‘करणारा माधव आहे. माई, छाया,दत्ता-सरिता आणि इतकंच काय तर मुख्य आकर्षण म्हणजे सुशल्या..उर्फ सुषमा आहे. त्यामुळे भीती, रहस्य आणि कोकणातल्या चित्रविचित्र प्रथा असा सर्व थाट पुन्हा अनुभवण्याची प्रेक्षकांना घरबसल्या संधी आहे. हा पहिला भाग प्रचंड गाजला होता. टीआरपीचे अनेक उच्चांक त्याने मोडले होते.
तेव्हा प्रेक्षकांनी घराबाहेर पडू नका आणि या सर्व मालिकांचा मनोसोक्त आस्वाद घ्या, पुन्हा घ्या.