सध्या लॉकडाउनमध्ये टेलिव्हीजनवर जुन्या मालिका किंवा रिपीट टेलेकास्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच जुन्या मालिका पुन्हा पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक त्याचाही आस्वाद घेत आहेत. यात रामायण महाभारत पाहण्याकडे प्रेक्षकांचा जास्त कल आहे. सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद असल्याने कलाकार आणि तंत्रज्ञ टीम घरीच आहेत. यात सोनी मराठी वाहिनीने युक्ती लढवत टेलिव्हीजनच्या इतिहासातील नवा प्रयोग केला आहे.
लॉकडाउनमध्ये कलाकार घरातच असताना घरातूनच शूट करुन नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'आठशे खिडक्या नऊशे दारं' असं या मालिकेचं नाव आहे. अभिनेता मंगशे कदम, लीना भागवत, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, समीर चौगुले, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळे ही स्टारकास्ट या मालिकेत दिसेल. श्रीरंग गोडबोले हे या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. घरबसल्या शूट होत असलेल्या या मालिकेचा प्रोमोही नुकताच प्रदर्शित झाला आहे. घरात शूट झालेलं असतानाही या कमाल प्रोमोचं कौतुक होत आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून इतका उत्तम प्रोमो तयार झाल्यानं आता मालिका काय कमाल करतेय याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच असेल.
ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.