सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे हे सुपरस्टार हंगामा प्लेच्या अंधातरी या आगामी ओरिजनल मराठी शोमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अधांतरी ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे. लाँग-डिस्टंस नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र रहावे लागते. ही कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरील आहेत.
क्लासमेट, लॉस्ट अॅण्ड फाऊंड, ऑनलाइन बिनलाइन, गुलाबजाम, रणांगण अशा मराठी सिनेमांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याच्या सांग तू आहेस का? जीवलगा, प्रेम हे, सिटी ऑफ ड्रिम्स आणि इतर मालिकांमधील भूमिकाही गाजतायत. अंधातरीमधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी तो म्हणाला, "मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आलाय असाच काळ यात आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत."
फास्टर फेणे, फोटोकॉपी, बघतोस काय मुजरा कर, वायझेड, रमा माधव हे सिनेमे आणि अनेक नाटकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली पर्ण पेठे म्हणाली, "परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवाला लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल."
माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी म्हणाला, "ही प्रेमकथा असली तरी अधांतरी ही प्रेक्षकांनी पाहिलेल्या इतर कथांपेक्षा वेगळी आहे. यातलं जोडपं एकमेकांना अधिक नीट जाणून घेण्याचा प्रयत्न करतंय आणि त्याचवेळी काही अनपेक्षित प्रसंगांचाही अनुभव घेतंय. या शोमधील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना स्वत:मधील काही गोष्टी दिसतील, असं मला वाटतं."
माझा होशील ना, पाहिले न मी तुला मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आशय कुलकर्णी म्हणाला, "मागील दीड वर्ष प्रचंड अनिश्चिततेचं होतं. या शोमध्ये प्रेक्षकांना हीच स्थिती पहायला मिळेल आणि ते एन्जॉयही करतील. इतकंच नाही, फार आपल्यातल्याच वाटणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांना ते या कथेचाच भाग असल्याची भावना देतील आणि या कथेत त्यांना गुंतवून टाकतील."
तर अभिनेता आरोह वेलणकर म्हणतो, "अधांतरी ही साधी मात्र फार वेगळी कथा आहे. या कथेच्या अंतरंगात बरंच काही आहे. या शोमध्ये माझी छोटीशी भूमिका असली तरी या शोमध्ये असावं असं मला वाटलं कारण एक अभिनेता म्हणून तुमच्याशी संवाद साधणाऱ्या कथेचा भाग असणं तुम्हाला नेहमीच आवडतं."
गणराज असोसिएट्स निर्मित आणि जीत अशोक दिग्दर्शित हा शो लवकरच हंगामा प्ले आणि पार्टनर नेटवर्क्स उपलब्ध असेल.